पुणे शहरात ६० सीएनजी पंपांवर, २ लाख वाहनांचा भार; म्हणून लागते वाहनांची रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:00 PM2022-03-21T13:00:00+5:302022-03-21T13:00:02+5:30
शहरातील सीएनजी पंपावरील गर्दी पाहून अनेक जण शहराबाहेर जाऊन सीएनजी भरून घेत आहेत
प्रसाद कानडे
पुणे: प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी व ई-वाहनांचा (CNG and e-vehicle uses) वापर वाढला पाहिजे. मात्र त्याला पूरक असणारी यंत्रणाच अत्यंत तोकडी आहे. पुण्यात जवळपास २ लाख सीएनजीवर धावणारी वाहने आहेत. मात्र त्यासाठी अवघे साठ पंप आहेत. साठ पंपावर भार येत असल्याने रोज हजारो पुणेकरांना वाहनांत इंधन भरण्यासाठी ३० ते ४० मिनिटे रांगेत थांबावे लागत आहे. शहरातील सीएनजी पंपावरील गर्दी पाहून अनेक जण शहराबाहेर जाऊन सीएनजी भरून घेत आहेत. वाहनांची संख्या लक्षात घेता पुण्याला आणखी किमान दोनशे पंपाची गरज आहे.
पेट्रोल व डिझेल च्या तुलनेत सीएनजीचे दर कमी आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारक आपले वाहन सीएनजीवर रूपांतरित करीत आहे. मात्र त्यांना आता पश्चतापाची वेळ आली आहे. कारण त्यांना सीएनजी भरून घेण्यासाठी किमान ४० ते ५० मिनिटे खर्ची घालावे लागत आहे. यात चारचाकीसह रिक्षा चालकांची संख्या जास्त आहे. शिवाय वाहनधारकांना लवकरात लवकर सीएनजी मिळावे म्हणून कर्मचारीदेखील तणावात व गडबडीने काम करतात. टाकीत सीएनजी भरताना त्याचे प्रेशर हे ४५० पौंड इतके असते. यावेळी काही अपघात घडला तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. तेव्हा पुण्यात वाहनांची संख्या लक्षात घेता सीएनजी पंप वाढविण्याची गरज आहे.
रोज ७ लाख किलो सीएनजीची विक्री :
पुण्यात साठ पंपावरून रोज सात ते साडेसात लाख किलो सीएनजीची विक्री होते. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली की विक्रीत वाढ होते. पुण्यातील वाहनांच्या संख्येचा विचार केला तर विक्रीतदेखील लवकरच वाढ होईल.
वाहनांना लागतो किती वेळ :
वाहनाचा प्रकार | सीएनजी टाकी क्षमता | रांगेतला वेळ | इंधन भरण्यास लागणारा वेळ |
---|---|---|---|
रिक्षा | ३ किलो | २५ ते ३० मिनिटे | ४ ते ७ मिनिट |
चारचाकी | ८ किलो | ३० ते ४० मिनिटे | ७ ते १० मिनिट |
अवजड वाहने | ३० किलो | ४० ते ४५ मिनिटे | १० ते १३ मिनिट |