60 दिवस उलटले, तरी वितरिकेला आवर्तन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:18+5:302021-05-12T04:11:18+5:30
शेतकरी आक्रमक, स्वतः सोडणार पाणी लासुर्णे : 60 दिवस उलटले, तरी नीरा डावा कालव्यावरील 43 क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडले ...
शेतकरी आक्रमक, स्वतः सोडणार पाणी
लासुर्णे : 60 दिवस उलटले, तरी नीरा डावा कालव्यावरील 43 क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडले नसल्याने येथील लाभधारक शेतकरी हतबल झाले आहेत. उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने पिके सुकून जाऊ लागली आहेत. जर 15 मेपर्यंत पाणी सोडले नाही, तर आम्ही सर्व शेतकरी 43 क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडू, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे.
दर वर्षी 43 क्रमांकाच्या वितरिकेच्या पाण्याचा प्रश्न उभा राहतो. वर्षभरात केवळ एकच आवर्तन पूर्ण क्षमतेने मिळाले. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने परिसरातील पिके जाळून जाऊ लागली आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पाणी सोडण्याची विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच 5 मेला पाणी सोडू, असे आश्वासन देखील संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. मात्र त्यानंतरही पाणी सोडले गेले नाही. याबाबत सोमवारी (दि. 10) येथील निळकंठेश्वर पाणी वापर संस्थेच्या वतीने पुणे येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंताना निवेदन देऊन शेतकरी स्वतः 15 मे रोजी वितरिकेला पाणी सोडतील असा इशारा देण्यात आला आहे.