चांदणी चाैकात शिवरायांचा ६० फुटी पूर्णाकृती पुतळा
By राजू हिंगे | Updated: February 7, 2025 13:04 IST2025-02-07T13:04:19+5:302025-02-07T13:04:51+5:30
‘स्थायी’ची फेरमान्यता : ७ कोटी ६० लाख रुपये खर्च करून उभारणार ‘हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प’

चांदणी चाैकात शिवरायांचा ६० फुटी पूर्णाकृती पुतळा
- राजू हिंगे
पुणे : चांदणी चौक येथील बावधन खुर्द सर्व्हे नंबर १९ आणि २० येथे ‘हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प’ उभारण्यात येणार आहे. येथे ३० फूट उंचीच्या चौथऱ्यावर तब्बल ६० फुटी ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ७ कोटी ६० लाख ३२ हजार रुपये खर्च करण्यासाठी स्थायी समितीने फेरमान्यता दिली आहे.
चांदणी चौकाकडून वारजेकडे जाणारा रस्ता आणि मुळशीकडून कोथरूडकडे जाणारा उड्डाणपूल तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या मध्ये ५ हजार ५४२ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. या जागेत ‘हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये स्टोन क्लाउडिंग असलेले प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. कमळाच्या पाकळ्यांच्या आकारातील कारंजे व त्यामध्ये अंदाजे १७ फूट उंचीच्या चौथऱ्यावर २० फूट उंचीचा ब्राँझमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यात येणार होता. पिवळ्या व लाल रंगाच्या स्टोनमधील पदपथ, जागेच्या दुसऱ्या बाजूला छोटे प्रवेशद्वार, मिळकतीच्या एका बाजूला आरसीसी रिटेनिंग वॉल, इतर बाजूला सीमा भिंत उभारली जाणार आहे. उर्वरित जागेमध्ये उद्यानविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली होती.
या कामासाठी महापालिकेने निविदा मागवली होती. त्यासाठी ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली होती. पण शिवप्रेमींच्या मागणीनुसार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६० फुटी ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, असे कळविले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार ६० फुटी ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ३० फूट उंचीचा चौथरा उभारावा लागणार आहे. यासाठी ७ कोटी ६० लाख ३२ हजार रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने फेरमान्यता दिली आहे.