६० लाखांचा अपहार; व्यवस्थापकावर गुन्हा
By admin | Published: June 30, 2015 12:14 AM2015-06-30T00:14:33+5:302015-06-30T00:14:33+5:30
येथील आयडीबीआय शाखेत खातेदाराच्या खात्यातून बँक व्यवस्थापक व अज्ञात इसमाने दि. १८ जानेवारी २०१२ ते दि. ३० मार्च २०१३ या कालावधीत
तळेगाव दाभाडे : येथील आयडीबीआय शाखेत खातेदाराच्या खात्यातून बँक व्यवस्थापक व अज्ञात इसमाने दि. १८ जानेवारी २०१२ ते दि. ३० मार्च २०१३ या कालावधीत १३ धनादेशांच्या माध्यमातून ६० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या खात्यातून लाखोंच्या रकमेची अफरातफर झाल्याने आपल्या खात्यातील रक्कम सुरक्षित असल्याची खातेदार खात्री करत होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक सुजाता अशोक पोखरकर (वय ४५, रा. खन्ना अपार्टमेंट, घाटकोपर, मुंबई) यांनी त्यांच्या व्यवसायासाठी तळेगाव दाभाडे येथील शहा कॉलनीतील आयडीबीआय बँकेच्या शाखेत खाते उघडून त्या खात्यात ८० लाख रुपये जमा केले होते. दि. १८ जानेवारी २०१२ ते दि. ३० मार्च २०१३ या कालावधीत बँक व्यवस्थापक व अज्ञात इसम यांनी पोखरकर यांची कुठलीही परवानगी न घेता परस्पर ५ लाख रुपयांचे ११, ३ लाख रुपयांचा १ व २ लाख रुपयांचा १ असे एकूण ६० लाख रुपयांचे १३ धनादेश काढून बँक खात्यातून रकमेची अफरातफर केली. (वार्ताहर)