बनावट डेबिट कार्डावरून लांबविले ६० लाख, स्किमरच्या साह्याने चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:16 AM2017-10-19T03:16:27+5:302017-10-19T03:16:42+5:30
एटीएम यंत्रात स्किमर आणि छोटा व्हिडीओ कॅमेरा बसून शहरातील १३४ नागरिकांचा डेबिट कार्डामधील डेटा चोरून एका टोळीने नागरिकांच्या खिशातील ६० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे.
पुणे : एटीएम यंत्रात स्किमर आणि छोटा व्हिडीओ कॅमेरा बसून शहरातील १३४ नागरिकांचा डेबिट कार्डामधील डेटा चोरून एका टोळीने नागरिकांच्या खिशातील ६० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार नायजेरियन नागरिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो स्वत:ला चर्चमधील धर्मगुरू असल्याचे सांगतो. त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
करण मेहर सोनार (वय ३८, रा. मीरारोड, ठाणे) व अर्ल अँड्र्यू अर्नेस्ट लॉरेन्स ( वय ३७, रा. वसंतनगर, वसई) अशी अटक आरोपींची नावे आहे. या प्रकरणी सूत्रधार असल्याच्या संशयावरून बॉबी युगोचुकवे (रा. मीरारोड, ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो स्वत:ला एका चर्चमधील धर्मगुरू असल्याचे सांगत आहे. या प्रकरणात सईद सय्यद, यासीर सय्यद, रोहित नायर, सज्जाद या चौघा साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत. आरोपींच्या ताब्यातून स्कीमर, मॅग्नेटिक कार्डरीडर, एटीएम मशिनचे पार्ट्स, मोबाईल सर्किटचा कॅमेरा वापरून तयार केलेले पीनहोल स्पाय कॅमेरे, राऊटर, दोन मोबाईल स्क्रीन्स, पोर्टेबल चार्जर, डबलगम टेप, कटर, २४ बनावट एटीएम कार्ड आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यातील करण सोनार याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो एका फायनान्स कंपनीत कामाला होता. तर अर्ल लॉरेन्स हा एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता.
पुणे शहरात मागील तीन महिन्यांपासून नागरिकांच्या खात्यातील पैसे बनावट एटीएम कार्डचा वापर करून परस्पर काढल्याच्या तक्रारी सायबर क्राईम सेलकडे येत होत्या. तक्रारदारांचे मूळ एटीएम कार्ड स्वत:जवळ असतानाही, कोणीतरी बनावट एटीएम कार्डचा वापर करून दिल्ली, मुंबई, गुजरात, दमन, कोलकाता आदी ठिकाणांवरून तक्रारदारांच्या बँक खात्यातील पैसे परस्पर काढून घेत होते. पोलिसांनी तब्बल ३० दिवसांचे प्रत्येकी
२४ तासांचे व्हिडिओ फुटेज पाहात या गुन्ह्याची उकल केली.
सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस कर्मचारी दीपक भोसले, किरण अब्दागिरे, नवनाथ जाधव, अनुप पंडित, आदेश चलवादी, शिरीष गावडे, सोमनाथ बोरडे, शीतल वानखेडे यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी तपासले तब्बल ३० दिवसांचे फुटेज
शहरातील कोरेगाव पार्क, मगरपट्टा, अप्पा बळवंत चौक या परिसरातील विविध बॅँकाच्या
११ एटीएममध्ये स्किमर लावण्यात आले होते. या हायटेक चोरट्यांनी नॅशनल कॅश रजिस्टार प्रणीलीची एटीएम यात निवडली होती. तसेच सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांना त्यांनी लक्ष्य केले होते. त्यामुळे या सर्व एटीएम सेंटरचे फुटेज तपासण्यात आले. तब्बल एक महिनाभराचे फुटेज तपासल्यानंतर अवघ्या दीड मिनिटांच्या फुटेजमध्ये एक आरोपी आढळला. तो एटीएम यंत्राला स्किमर बसवत असल्याचे दिसते. मात्र, केवळ फुटेजवरून त्याचा माग करणे शक्य नव्हते. यातच त्याच्या हातामध्ये एका दुकानाची पिशवी आढळून आली होती. ही पिशवी एका मोबाईल शॉपीची होती. त्याआधारे मोबाईल शॉपी शोधून काढून तेथील खरेदीदार तपासले असता आरोपीने तेथून मोबाईल खरेदी केला असल्याची माहिती मिळाली. या मोबाईलवरून माग काढत आरोपी करण मेहर सोनार याला जेरबंद केले.
बँक व्यवस्थापकाला धरणार जबाबदार
ज्या बॅँकेच्या शाखेच्या परिसरातील एटीएममध्ये अशा घटना घडतील, तेथील बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकासही पोलीस यापुढे जबाबदार धरणार आहेत. बॅँक व्यवस्थापकांची जबाबदारी त्यांच्या अखत्यारित येणाºया एटीएमची सुरक्षा व सीसीटीव्ही फुटेज राखण्यासंदर्भात असणार आहे.
स्किमरची आॅनलाईन खरेदी
आरोपींनी एनसीआर या कंपनीच्या एटीएम मशीनच्या कार्ड स्वाईप स्लॉटसारखाच त्याच्यावर फिट होणारा बनावट स्लॉट गुन्हा करताना वापरला होता. एटीएम कार्डचा डेटा चोरी करण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने हा स्किमर मागविला होता. राऊटरच्या साह्याने वाय-फायद्वारे एटीएममध्ये पैसे काढायला आलेल्या ग्राहकाच्या कार्डची माहिती चोरत होते. ही माहिती आारोपींच्या गुगल ड्राईव्हवर सेव्ह होत होती. शनिवार व रविवारी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ते माहिती चोरण्यासाठी स्किमरचा वापर करत होते. स्किमरला तीन तास चार्जिंग असल्याने तीन तासानंतर स्किमर काढला जात होता. चोरीच्या डेटाचा वापर करून ते अवघ्या पाच तासांत क्लोन एटीएम कार्ड बनवून ग्राहकाच्या खात्यातील पैसे काढून घेत होते. स्किमर व इतर यंत्रणा बसवण्यासाठी त्यांना अवघ्या दीड ते दोन मिनिटांचा कालावधी लागत होता. स्किमर लावाताना हाताचे ठसे राहू नये, याचीही काळजी आरोपी घेत होते.