पुणे जिल्ह्यात ६० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:56+5:302021-03-08T04:11:56+5:30

पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दररोजच्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०० ...

60% patients in home isolation in Pune district | पुणे जिल्ह्यात ६० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

पुणे जिल्ह्यात ६० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

Next

पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दररोजच्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०० ते १००० यादरम्यान वाढत आहे. सध्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांनी घराबाहेर पडून संक्रमण वाढीस हातभार लावू नये, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.

आॅक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांच्या काळात कोरोना रुग्णसंख्या खूप कमी झाल्याने नागरिकांना आणि प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला होता. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात आल्याने दैनंदिन व्यवहारही पूर्ववत झाले. हॉटेल, मॉल, चित्रपटगृहे सुरू झाली, शाळा, महाविद्यालयेही उघडण्यात आली. लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने मत वैद्यकतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा तक्रारींचे नागरिकांमधील प्रमाण वाढले आहे. औषध विक्रेत्यांकडून कोणत्यातरी गोळ्या घ्यायच्या किंवा दुखणे अंगावर काढायचे याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांकडे गेल्यावरही त्यांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी करून घेतली जात नाही. चाचणी केली की रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार, त्यामुळे चाचणीच करायची नाही, अशी मानसिकता तयार झाल्यामुळे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाल्यावर तिच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्तींना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढल्यामुळे चाचणी करून घेतली जात नाही. आमच्यामध्ये लक्षणे दिसत नाहीत तर चाचणी कशाला करायची, असा पवित्रा घेतला जातो. यांच्यापैकी काही जण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण असतात. प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे त्यांना त्रास होत नसला तरी त्यांच्याकडून इतर १० जणांकडे कोरोनाचे संक्रमण होते आणि त्यातूनच कोरोना वाढीस हातभार लागतो. त्यामुळे केवळ स्वत:च्या आरोग्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकी म्हणून इतरांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत जनरल फिजिशियन डॉ. केदार बापट यांनी व्यक्त केले.

-----------------------

सर्दी, खोकला, तापेच्या तक्रारी वाढत आहेत. ही लक्षणे दिसणा-या प्रत्येकाला कोरोना झालेला नसला तरी १० पैकी २ व्यक्तींमध्ये निदान होऊ शकते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करत नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मिसळणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत आणि घरात स्वत:ला विलग करावे. कोरोनामुळे गेल्या एक वर्षात अनेकांनी आपले नातेवाईक, जवळची माणसे गमावली आहेत. गंभीर परिस्थिती पुन्हा उद्भवू लागली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे, हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे अनिवार्य आहे.

- डॉ. नलिनी साळुंखे, जनरल फिजिशियन

-------------------------

जिल्हा आकडेवारी :

तारीख सक्रिय रुग्ण रुग्णालयातील रुग्णगृह विलगीकरण

५ फेब्रुवारी ४८१८ १७८२ ३०३६

१२ फेब्रुवारी ४८८८ १७९९ २६८९

१९ फेब्रुवारी ६३६२ २४७० ३८९२

२६ फेब्रुवारी ९३८९ ३८१७ ५५७२

४ मार्च १२१२९ ४९८१ ७१४८

Web Title: 60% patients in home isolation in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.