देशातील ६० टक्के शेतीला पाणी नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 11:51 PM2019-02-03T23:51:28+5:302019-02-03T23:51:53+5:30
देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही.
बारामती - देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही. शेतीचे क्षेत्र वाढत नाही. शेतीच्या वाटण्या होत आहेत. परिणामी शेतीचे क्षेत्र कमी होत असून कुटुंब मात्र वाढत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
माळेगाव बु. (ता. बारामती) येथील ‘व्हीएनएस निर्माण तावरे सिटी’ या प्रकल्पाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, की आपण कृषिमंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतक-याने आत्महत्या केली होती. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासमवेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. त्या ‘माऊली’ने डोळ्यात पाणी आणून सांगितले. शेतकºयाच्या डोक्यावर कर्ज होतं. त्या कर्जाची परतफेड करता आली नाही. कर्जातील काही भाग मुलीच्या लग्नासाठी काढून ठेवला होता. लग्नाला विलंब झाला. कर्जाचे व्याज वाढत गेले. त्यामुळे बँकेची नोटीस आली. लिलाव झाला तर लग्नही रद्द होईल. या भीतीपोटी यवतमाळच्या शेतकºयानं आत्महत्या केल्याचं त्यांच्या पत्नीनं सांगितलं. देशाच्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळू शकते, मग शेतक-यांना का नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला,हे चित्र बदलायचे आहे. त्यामुळे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. त्यानंतर तातडीने ७१ हजार कोटींच्या कर्जमाफीसह कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला.
या वेळी अॅड. केशवराव जगताप यांनी निष्क्रीय शासनामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आल्याची टीका केली. तसेच, अॅड. राहुल तावरे, संतोष वायचळ यांनी प्रास्ताविक केले. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कलाकार शंतनू मोघे, आश्विनी महांगडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड जे. पी. धायतडक, कलाकार शंतनु मोघे यांच्यासह विविध पदाधिकारी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
‘व्हीएनएस निर्माण तावरे सिटी’च्या वतीने अशोकराव तावरे, अॅड. केशवराव जगताप, प्रकाश चव्हाण, शंकर तावरे, अनिल तावरे, सचिन भोसले, दिलीप तावरे, कल्याण पांचागणे, अॅड. राहुल तावरे यांनी स्वागत केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सभापती संजय भोसले, बाळासाहेब तावरे, रोहिणी तावरे, अभिनेत्री स्नेहलता तावरे, शहाजी काकडे, छोटा पुढारी घनश्याम दरोडे आदी उपस्थित होते.
...तेवढेदेखील पैसे शेतक-यांना दिले नाही
देशाच्या अर्थसंकल्पाने शेतक-यांसाठी वार्षिक ६ हजार रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे चहाच्या कपाला जेवढे पैसे मिळतात, तेवढेदेखील पैसे शेतकºयांना दिले नाही. असली दया आम्हाला नको. शेतीमालाला, शेतकºयांच्या घामाला भाव द्या. शेतकरी लाचारीने वागणार नाही, अशा शब्दांत अर्थसंकल्पात शेतकºयांसाठी जाहीर केलेल्या निर्णयावर माजी कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केली.
...त्यांना देशातील ८० टक्के खाणा-यांची काळजी आहे
देशातील साखरेसाठी जाहीर केलेला २९०० रुपये भाव पडणारा नाही. त्यामुळे उसाला चांगली किंमत देता येत नाही. किमान ३२०० ते ३३०० दर साखरेला मिळाल्यास शेतकºयांना उसाला चांगली किंंमत देता येईल.
कमीत कमी शेतकºयांना ३ ते ३५०० टन शेतकºयांना मिळल्याशिवाय शेतकºयाला ऊर्जितावस्था येणार नाही. मात्र, राज्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० टक्के उत्पादकांपेक्षा देशातील ८० टक्के खाणा-यांची काळजी आहे.
त्यामुळे साखरेच्या किंमती वाढविण्याचा निर्णय होत नाही, अशी टीका माजी कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.