अध्यापन कौशल्यवाढ कार्यशाळेत ६० शिक्षकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:22 PM2018-08-28T23:22:15+5:302018-08-28T23:22:39+5:30
अमेरिकास्थित तज्ज्ञांचे मार्गदर्शन : सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयत्न
बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान येथे गुणवत्तावाढ या उपक्रमांतर्गत विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विद्यालयातील शिक्षकांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत एकूण ११ शाळांतील ६० शिक्षकांनी सहभाग घेतला. दैनंदिन अध्यापन व अध्ययन कौशल्यांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ होण्यासाठी प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
अमेरिकास्थित शिक्षणतज्ज्ञ मिस मेलिसा डिक्सन यांनी मार्गदर्शन केले. मूल्यांवर आधारित अध्यापन कौशल्य, शिक्षकांमध्ये प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी अध्यापनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, ज्ञानाधिष्ठित शिक्षणपद्धती, विषयाशी संबंधित नवीन ज्ञानाचे ग्रहण करणे, कृती, उपक्रम यांच्या माध्यमांतून कसे शिकवावे, काय शिकवावे व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तरानुसार अध्यापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
प्रात्याक्षिकासहित शिक्षकांशी संवाद साधला. दुसऱ्या सत्रात मुद्यांच्या आधारे आशयाचे स्पष्टीकरण करून अध्यापनाचे नियोजन करणे, मुलांचे अध्ययन, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती यांची वाढ होण्यासाठी नवनवीन मूल्यमापन पद्धतीचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले. मुलांचे पूर्वानुमत, अनुभव जाणून घेणे व या गोष्टीचे प्रत्यक्ष वर्गामध्ये उपयोजन कसे करावे याबाबतीत मौलिक मार्गदर्शन केले. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, विश्वस्त नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका गीता बीस्ट यांनी केले. प्रास्ताविक विद्या प्रतिष्ठानच्या इंग्रजी माध्यमिक शाळेच्या प्राचार्या राधा कोरे यांनी केले. प्राचार्या सरिता शिंदे यांनी आभार मानले. या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्या कल्पना बारवकर, प्राचार्या जॉयसी जोसेफ,प्राचार्या जॉयसी जोसेफ, सोमेश्वर स्कूलचे प्राचार्य सचिन पाठक यांनी विश्वस्त सुनेत्रा पवार आणि विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली केले.