महापालिका तिजोरीत बांधकाम विभागाने दिले ६०० कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:30+5:302021-09-02T04:20:30+5:30
पुणे : महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये मिळकत करातून नुकतेच जमा झाले असताना, पहिल्या पाच महिन्यांतच बांधकाम विभागाकडूनही ...
पुणे : महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये मिळकत करातून नुकतेच जमा झाले असताना, पहिल्या पाच महिन्यांतच बांधकाम विभागाकडूनही सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी विविध परवानग्यांच्या माध्यमातून जमा झाला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी दर आठवड्याला महसूल समितीच्या विविध विभागांची बैठक घेतली जाते़ या बैठकीत बांधकाम विभागाने बांधकाम शुल्कातून या आर्थिक वर्षात १ हजार १८५ कोटी रुपये इतके उत्पन्न गृहीत धरले असून, पहिल्या पाच महिन्यात सहाशे कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती दिली़
कर आकारणी आणि संकलन विभागाने पहिल्या पाच महिन्यांत १ हजार कोटींचा टप्पा पार केला असून, नवीन २२ हजार मिळकतींवर कर आकारणी केली आहे़ दरम्यान मंगळवारी राज्य शासनाकडून येणाऱ्या जीएसटी व स्टॅम्प ड्युटीपैकी ३४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे व उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर दोन टप्प्यात मिळणार असून, यातून महापालिकेच्या तिजोरीत सुमारे अडीच हजार कोटी रूपये जमा होणार होतील़ त्यामुळे यावर्षी साडेआठ हजार कोटी रूपयांचे उत्पन्न महापालिका नक्की मिळवेल, असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला आहे़
----------------------