आयुक्तांमुळे रखडली ६०० कोटींची कामे
By admin | Published: April 21, 2017 06:07 AM2017-04-21T06:07:27+5:302017-04-21T06:07:27+5:30
महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यामुळे शहरातील ६00 कोटींची कामे रखडली असून, शहराच्या विकासाला त्यामुळे खीळ बसत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी
पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्यामुळे शहरातील ६00 कोटींची कामे रखडली असून, शहराच्या विकासाला त्यामुळे खीळ बसत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. खोदाईसंदर्भात राज्यातील सर्व पालिकांना महावितरणने एक प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला पुणे वगळता सर्व पालिकांच्या आयुक्तांनी प्रतिसाद दिला मात्र, पुण्याच्या आयुक्तांनी अद्यापही त्यावर कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यामध्ये जवळपास १ हजार २६० कोटींची कामे सुरु आहेत. विविध योजनांमधून जवळपास ८00 कोटींची कामे पूर्ण झाली असून अद्याप ४00 कोटींची कामे शिल्लक आहेत. शहरातील केबल्स भूमिगत करणे, शेतकऱ्यांना नवीन केव्ही उभे करून देणे, शहरामध्ये अक्षय वीज देणे नवीन केव्ही सेंटर्स उभी करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. महावितरणच्या केबल्स भूमिगत करण्यासाठी शहरांमध्ये खोदाई करावी लागते. त्यासाठी सर्व पालिकांना एक प्रस्ताव तयार करुन देण्यात आला होता. ‘महावितरण स्वत:च खोदाई करणार, काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वी जसा होता तसा रस्ता पूर्ववत तयार करुन देणार, त्यानंतर पालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यावरच संबंधित ठेकेदाराला बिल अदा केले जाईल. यासंपूर्ण कामाचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.’ असा तो प्रस्ताव होता. या प्रस्तावाला राज्यातील सर्व पालिकांनी स्वीकारले. मात्र, पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी कोणतेही सहकार्य केले नाही.