पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 01:36 PM2017-09-22T13:36:30+5:302017-09-22T13:36:35+5:30
पुण्यात धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी ( 22 सप्टेंबर ) सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे.
पुणे, दि. 22- धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी ( 22 सप्टेंबर ) सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. शुक्रवारी सकाळी पुणे वेधशाळेत 12.5 मि.मी पाऊसाची नोंद झाली होती.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे बुधवारी पावसाचा जोर वाढल्यावर खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक 23 हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे पुणे शहरात पूर आला होता. त्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. पानशेत, वरसगाव धरणातून विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात वाढ करण्यात आली आहे.
जायकवाडीच्या 18 दरवाजांतून सोडले पाणी
जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी रात्री ११.३० वाजता धरणाचे १८ वक्र दरवाजे अर्धा फूट वर उचलण्यात आले असून, धरणातून दहा हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. दरवाजा क्र. १० ते २७ या दरवाजांतून पाणी सोडण्यात आले. यावेळी जायकवाडीचे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोडे, तहसीलदार महेश सावंत, जायकवाडी धरण उपअभियंता अशोक चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, नगर परिषद मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, आर. ई. चक्रे, माजी नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, नामदेव खरात, पवन लोहिया, शाम लोहिया, भिकाजी आठवले आदी उपस्थित होते. जायकवाडी धरणातून यापूर्वी २००८ मध्ये सकाळी ११ वाजता १ लाख क्युसेक्सने पाणी सोडले होते. हे पाणी गोदावरी नदीपात्राबाहेर न गेल्याने कुठलीही हानी झाली नव्हती. परंतु २००६ मध्ये अडीच लाख क्युसेक्सने पाणी सोडले, तेव्हा ७० टक्के पैठण शहर पाण्याखाली गेले होते. शिवाय १५ गावांतही पाणी घुसले होते.