Pune Police: विसर्जन मिरवणुकीत सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त; मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार
By नितीश गोवंडे | Published: September 15, 2024 06:47 PM2024-09-15T18:47:55+5:302024-09-15T18:49:53+5:30
ध्वनिवर्धक वापरण्याबाबत आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार
पुणे: वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (दि. १७) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पाेलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर, तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर, तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.
विसर्जन मिरवणूक सोहळ्यात घातक लेसर दिव्यांचा वापर, तसेच उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लेझर दिव्यांचा वापर न करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना वेळोवेळी आवाहन केले आहे. विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांकडून यंदाही ध्वनीवर्धक यंत्रणा आणि घातक लेसर दिव्यांचा वापर करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे, तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
मध्यभागातील १७ रस्ते बंद...
शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते, तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (दि. १७) रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. - जी. श्रीधर, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा