पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत अडीच महिन्यात ६१ बलात्कार; आप पालक युनियनचे मुक निषेध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 01:28 PM2022-03-25T13:28:36+5:302022-03-25T13:28:44+5:30
शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत शिरून एका नराधमाने ११ वर्षांच्या मुलीला शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना बुधवारी घडली
पुणे : येरवडा येथील एका शाळेत शिरून एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर खुनी हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत शिरून एका नराधमाने ११ वर्षांच्या मुलीला शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना बुधवारी घडली. त्यानंतर तातडीने आरोपीला अटकही करण्यात आली. पण पुण्यात वारंवार अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. शहरातील सामाजिक संस्था, विरोधी पक्ष यांच्याकडून मुलींच्या सुरक्षेबाबत सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
आज शिवाजीनगर परिसरातील ज्या शाळेत हि घटना घडली. त्याठिकाणी आप पालक युनियनच्या पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शाळेत एका विद्यार्थिनी वर झालेल्या बलात्काराचा 'मूक निषेध' म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत अडीच महिन्यात ६१ बलात्कार झाले आहेत प्रशासन काय करतंय अशी टीका यावेळी करण्यात आली.
शाळेच्या परिसरात युनियनचे कार्यकर्ते स्लोगन घेऊन उभे राहिले होते. ११ वर्षीय मुलीच्या अत्याचाराचा तीव्र निषेध, दामिनी भरोसा सेल काय करतात, स्मार्ट सिटीत अडीच महिन्यात ६१ बलात्कार, असे काही स्लोगन तयार करून आंदोलन करण्यात आले.
आरोपी शाळेबाहेरचा?
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, शाळेत सीसीटीव्ही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत. शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नाही, याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव अधिक तपास करीत आहेत.
सुरक्षारक्षकाने ‘त्या’ व्यक्तीला आत सोडलेच कसे?
शिवाजीनगरमध्ये भरवस्तीत असलेल्या मुलींच्या शाळेमध्ये एका अनोळखी व्यक्तीला तेथील सुरक्षारक्षकाने सोडलेच कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण जर मुलींचीच शाळा असेल, तर ओळखपत्र दाखवून आत सोडणे आवश्यक आहे किंवा प्रवेशद्वारावरच ओळखपत्र पाहिले पाहिजे. जर ती व्यक्ती शाळेत प्रवेश करून आडनाव माहीत असलेल्या मुलीला बोलते, याचा अर्थ त्या व्यक्तीने अगोदर तिथे येऊन पाहणी केलेली असणार आहे. त्यामुळे यामध्ये प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने जर त्या व्यक्तीला आत सोडले नसते, तर हा प्रकार घडलाच नसता, अशीही चर्चा केली जात आहे.
शिक्षिका, मुख्याध्यापकांची सतर्कता
हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापक यांनी लगेच कार्यवाही करीत पोलीस आणि पीडित मुलीच्या घरच्यांना माहिती दिली. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षिका या दोघांनी सतर्कता दाखविली. तसेच पीडित मुलीच्या मैत्रिणींनी याविषयी आपल्या शिक्षिकांना सांगितले हेदेखील योग्यच केले. कारण ‘ती’ मुलगी बोलली आणि तिच्या मैत्रिणींनी शिक्षिकांना सांगितल्यामुळे हा प्रकार समोर येऊ शकला. त्याचे रेखाचित्रही तयार होऊ शकले.