जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान
By admin | Published: October 16, 2014 06:19 AM2014-10-16T06:19:59+5:302014-10-16T06:19:59+5:30
सर्वच मतदारसंघात चौरंगी- पंचरंगी लढती रंगल्याने झालेल्या चुरशीच्या वातावरणाचे प्रतिबिंब मतदानात पडून पुणे जिल्ह्यात विक्रमी ६२.५० टक्के मतदान झाले.
पुणे : सर्वच मतदारसंघात चौरंगी- पंचरंगी लढती रंगल्याने झालेल्या चुरशीच्या वातावरणाचे प्रतिबिंब मतदानात पडून पुणे जिल्ह्यात विक्रमी ६२.५० टक्के मतदान झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला फटका बसणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. चुरशीच्य लढती असणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी रांगा लावून मतदान केले.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ५५.५० टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ५७़४४ टक्के मतदान झाले होते़ यंदाच्या वेळी चुरस वाढल्याने या दोन्ही निवडणुकांपेक्षा मतदान वाढले. ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. शहरातही सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने येथीलही मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे़ सायंकाळी ६ वाजता मतदान संपण्याच्यावेळी अनेक मतदान केंद्रावर रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती़ सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ५५़५८ टक्के मतदान झाले होते़ २००९ मधील विधानसभा निवडुकीत पुणे जिल्ह्यात ५५़ ४४ टक्के मतदान झाले होते़
जिल्ह्यात इंदापूरमध्ये सर्वाधिक ७७़३६ टक्के तर पुणे कॅन्टोंमेंटमध्ये सर्वात कमी ४२ टक्के मतदान झाले आहे़ त्याखालोखाल बारामती ७१़३७ टक्के, भोर ७१़३७, जुन्नर ७१़३६, खेड आळंदी ७१, दौंड ७०़९८, पुरंदर ७०़५८, आंबेगाव ६७़८९, शिरुर ६५़८४ टक्के मतदान झाले आहे़
पुणे शहरातील आठ मतदारसंघात सर्वाधिक कसबा पेठमध्ये ५९़८८ टक्के मतदान झाले़ कोथरूड ५७़७, खडकवासला ५३़१४, पर्वती ५४़८, हडपसर ५२़०८, शिवाजीनगर ५१़०२, वडगाव शेरी ५०़४, कॅन्टोंमेंट ४६़५७ टक्के झाले़
पुणे जिल्ह्यातील अनेक मतदार संघात सकाळपासून वेगाने मतदानाला सुरुवात झाली़ अनेक मतदारसंघात विशेषत: जुन्नर, भोर, इंदापूर, बारामती, पुरंदर येथे पहिल्या दोन तासात २५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते़ कोथरूड मतदार संघात चार ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या़ तेथील मतदान काही वेळ बंद पडले होते़ ही मशीने तातडीने बदलण्यात आली़ जवळपास सर्वच मतदारसंघात जबरदस्त चुरस असली तरी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर घेतलेली काळजी आणि मोठा पोलीस बंदोबस्त यामुळे किरकोळ अपवाद वगळता शहर व जिल्ह्यात शांततेने मतदान पार पडले़
शहरी भागात सकाळी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडल्याचे दृश्य लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिसून आले होते़ हे प्रमाण यंदा कमी होते़ अनेक ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदारांची संख्या तुरळक दिसून येत होती़ शहरी भागात मतदारांना रिक्षातून आणण्याचे प्रमाण अधिक होते़ काही ठिकाणी यावरुन तक्रारी करण्यात आल्या़ दुपारनंतर मतदारांना बाहेर काढण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत होते़ दुपारनंतर विशेषत: झोपडपट्टी परिसरातील मतदान मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याचे दिसून येत होते़