देशात ६ महिन्यात ६३ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात; आफ्रिकी देशांमधून वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:35 PM2017-11-29T18:35:05+5:302017-11-29T18:38:35+5:30
इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब या आखाती देशांबरोबरच आफ्रिकी देशांमधून गैर बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. विशेषत: पश्चिमी आफ्रिकी देश बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, व सेनेगल मधून या तांदळाला भरपूर मागणी आहे.
पुणे : इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब या आखाती देशांबरोबरच आफ्रिकी देशांमधून गैर बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. विशेषत: पश्चिमी आफ्रिकी देश बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, व सेनेगल मधून या तांदळाला भरपूर मागणी आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत भारताने ६३ लाख टनांची तांदळाची विक्रमी निर्यात केली आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही वित्तवर्षातील पहिल्या सहामहिन्यांचा हा उच्चांक आहे. जगात तांदळाची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या थायलंड व व्हिएतनाम या देशांच्या तांदळाच्या निर्यातीत भारताने गेल्या तीन वर्षापासून माग टाकले आहे.
मागील वित्तवर्षात भारताने पहिल्या सहा महिन्यात तांदळाची ५५ लाख टन निर्यात केली होती. त्या तुलनेत या सहा महिन्यांची तांदळाची निर्यात १४% अधिक आहे. आफ्रिकी देशांमधून गैर बासमती तांदळाला मागणी वाढलेली आहे. विशेषत: पश्चिमी आफ्रिकी देश बेनीन, आयव्हरी कोस्ट, गयाना, व सेनेगल मधून या तांदळाला भरपूर मागणी आहे. आफ्रिकी देशांशिवाय भारताच्या शेजारील नेपाळ व बांगलादेश या राष्ट्रांनी देखील गैर बासमती तांदळाची भारताकडून आयात वाढवली आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ या काळात भारताने गैर बासमती तांदळाची ४१.५० लाख टन निर्यात केली आहे, जी मागील वर्षाच्या ३५ लाख टनांच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक धवल शहा यांनी दिली.
बासमती तांदळाच्या निर्यातीनेही एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत भारताने २१.५० लाख टनांची बासमती तांदळाची निर्यात केली आहे. आतापर्यंतच्या सर्व वित्तवर्षातील पहिल्या सहामाहीसाठी हा उच्चांक आहे. मिडल ईस्ट, अर्थात पश्चिम आशियायील आखाती देशांमध्ये बासमती तांदळाला खूप मागणी असते. भारताची बासमती तांदळाची ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताची बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती ह्या आखाती देशांना होते. इराणने यावर्षी बासमती तांदळाची आयात वाढवली आहे. त्याचबरोबर युरोपिअन महासंघातील देश व अमेरिका ही मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहेत.
मागील ३ वर्षांपासून भारत जगातील सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा देश असून चालू वर्षीही भारत थायलंड व विएतनाम या देशांना मागे टाकून तांदूळ नियार्तीत जगात प्रथम क्रमांकावर राहील. या वर्षी निर्यात चांगली असल्यामुळे, गेल्यावर्षीच्या तुलनेत ११२१ बासमती व पारंपारिक बासमती भाताचे (धान) पंजाब, हरियाणा, दिल्ली येथील दर १० ते १५ % जास्त निघाले.
भाताचे दर १० ते १५% उंच निघाल्यामुळे ११२१ बासमती व पारंपरिक बासमती तांदळाचे दरही आपल्या येथे मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १५% जास्त राहतील.
बासमती भाताचे (धान) सध्याचे दर रु. प्रती क्विंटल मध्ये:
वित्तवर्ष. ११२१ बासमती. पारंपरिक बासमती
२०१६-१७ ३००० ते ३२००. ३७०० ते ४०००
२०१७-१८ ३२०० ते ३५००. ४००० ते ४३००
मध्यप्रदेश व गुजरात येथून नवीन तांदळाची आवक सुरु झालेली असून मार्केट मधील दर :
नवीन कोलम तांदूळ : ३५ ते ४० रुपये प्रती किलो
नवीन लचकारी तांदूळ : ४० ते ४५ रुपये प्रती किलो