रिंगरोडची ६३ टक्के जमीन मोजणी पूर्ण; आता लवकरच मोबदला निश्चित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:33+5:302021-07-08T04:09:33+5:30
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडची वाहतूककोंडी फोडण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिंगरोडसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ...
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडची वाहतूककोंडी फोडण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिंगरोडसाठी जमीन मोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांत पश्चिम भागातील ६८.८० किलोमीटर लांबीच्या रिंगरोडसाठी ३७ गावांतील सुमारे ६३ टक्के जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. यामुळेच आता लवकरच रिंगरोडमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्याचे पॅकेज जाहीर केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने चर्चा सुरू केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या भोवती पूर्व आणि पश्चिम भागात रिंगरोड होणार आहे. पूर्व भागात १०३ किलोमीटर लांबीचा रिंग रोड असून, तो ४६ गावांमधून जातो. पश्चिम भागाचा ६८.३ किलोमीटर लांबीचा रिंगरोड असून, तो ३७ गावांमधून जातो. एकूण १७२ किलोमीटर लांबीचा रिंगरोड मावळ, मुळशी, हवेली, भोर, पुरंदर या पाच तालुक्यांमधील ८१ गावांमधून जातो. या रिंगरोडसाठी १५८५.४७ हेक्टर जमीन संपादित करायची असून, त्यासाठी ४९६३.५९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे; तसेच एकूण बांधकामासाठी १७७२३.६३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
रिंगरोडसाठी जमिनी घेतल्यानंतर, त्यांच्याशी रस्ते विकास महामंडळ करार करणार आहे. एकाच दिवशी एकाच टप्प्यात त्यांना पैसे दिले जाणार आहेत. संबंधित विभागातील प्रांताधिकाऱ्यांकडून जमिनीचे मूल्यांकन ठरविले जाईल. त्याला टाऊन प्लॅनिंग विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर अंतिम मान्यता जिल्हाधिकारी देणार आहेत. दिवाळीपर्यंत पूर्व आणि पश्चिम भागातील रिंगरोडसाठीच्या जागांची मोजणीपूर्ण संपादनाची प्रक्रिया होणे अपेक्षित आहे.