पुण्यात ६३ टक्के बरसला, खडकवासला प्रकल्प निम्मे भरले; १० महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

By नितीन चौधरी | Published: July 22, 2024 06:29 PM2024-07-22T18:29:03+5:302024-07-22T18:29:17+5:30

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ५२ टक्के अर्थात १५.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला

63 percent rains in Pune, Khadakwasla project half full; Satisfactory water storage in 10 important dams | पुण्यात ६३ टक्के बरसला, खडकवासला प्रकल्प निम्मे भरले; १० महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

पुण्यात ६३ टक्के बरसला, खडकवासला प्रकल्प निम्मे भरले; १० महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यात सुमारे सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला आहे. तर दौंडमध्येदेखील पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ३०९ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यानुसार आतापर्यंत १९२.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहा महत्त्वाच्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ५२ टक्के अर्थात १५.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोर धरला आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हे व जुन्नर या तालुक्यांमध्ये २२ पैकी सरासरी २० दिवस पाऊस झाला आहे. तर शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये तुलनेने पावसाचे दिवस कमी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १९२.६ मिलिमीटर पाऊस झाला असून २२ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ६३ टक्के पाऊस झाला आहे. वेल्हे तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ८८२.६ मिलिमीटर पाऊस झाला असून हा पाऊस सरासरीच्या ८९.३ टक्के इतका आहे. मावळ तालुक्यात आतापर्यंत ५९४.४ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला आहे. टक्केवारीचा विचार करता दौंड तालुक्याने सरासरी ओलांडली असून येथे आतापर्यंत ६६.३ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या १०२.८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी ६३.४ मिलिमीटर पाऊस पुरंदरमध्ये झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ४९.८ टक्के इतकाच आहे.

दुसरीकडे खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चारही धरणात १५.२४ टीएमसी अर्थात क्षमतेच्या ५२.२७ टक्के जलसाठा तयार झाला आहे. गेल्यावर्षी याच तारखेला चारही धरणांमध्ये १४.११ टीएमसी अर्थात ४८.४१ टक्के पाणीसाठा होता.

जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती या चार तालुक्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी असल्याने खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी खडकवासला प्रकल्पातून खरीप आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले. खडकवासला डाव्या कालव्यातून शनिवारी ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. रविवारी त्यात वाढ करून ७०० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले. तर सोमवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने हा विसर्ग ७०० वरून १००५ क्युसेक करण्यात आला.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस

तालुका      पाऊस        टक्के

हवेली        १०२.४        ५२.२
मुळशी       ५०८.२       ७८.७
भोर           ३३२.२        ९०.६
मावळ       ५९४.४        १२७
वेल्हे          ८८२.६        ८९.३
जुन्नर           ९९.८        ४५.६
खेड          १०४.६         ६३.२
आंबेगाव    २२८.७         ९२.५
शिरूर        ५३.४          ७३.७
बारामती     ३४.५           ५७.३
इंदापूर       ७३.६           ९०.६
दौंड          ६६.३           १०२.८
पुरंदर        ६३.४            ४९.८

एकूण       ३०९.३           ६२.३

जिल्ह्यातील धरणसाठा (टक्क्यांमध्ये)

डिंभे - २७.५४
पानशेत - ५९.२८
वरसगाव - ४६.०९
खडकवासला - ७७.७३
पवना - ४५.४५
चासकमान - २९.८६
घोड - ८.८२
आंद्रा - ४०.३३
नीरा देवघर - ४३.८१
भाटघर - ४९.९५
टेमघर - ३९.९४

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा

एकूण १५.२४--५२.२७
गेल्या वर्षी १४.११--४८.४१

Web Title: 63 percent rains in Pune, Khadakwasla project half full; Satisfactory water storage in 10 important dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.