आंबा महोत्सवातील ६३ स्टॉल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:54 PM2018-05-04T18:54:13+5:302018-05-04T18:54:13+5:30
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड परिसरात शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाच्या स्टॉलला शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत महोत्सवातील तब्बल ६३ स्टॉल जळून खाक झाले. यामध्ये शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तब्बल दोन ते तीन हजार पेट्या आंब्यांचा पूर्णपणे कोळसा झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ दाखल होत आग आटोक्यात आणली.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून पणन मंडळ कार्यालयाच्या आवारात हा महोत्सव सुरू होता. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील जवळपास ७३ ते ७५ शेतकरी सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने एका स्टॉलमध्ये प्रत्येक शेतक-यांच्या सुमारे २५ ते ३० पेट्या ठेवल्या असल्याचे सांगण्यात आले. आंब्याची विक्री झाल्यानंतर आंब्याच्या रिकाम्या पेट्या तसेच गवत मोठ्या प्रमाणात आवारातच पडून होते. त्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. यामध्ये, सर्व स्टॉल जळून खाक झाले.
पणन मंडळाच्या वतीने महोत्सवाच्या ठिकाणी आगप्रतिबंधक सर्व योजना करण्यात आल्या होत्या. मात्र, लाकडी पेट्या, गवत तसेच मंडपाच्या कापडामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्यानंतर शेतक-यांनी काही प्रमाणात आंबा बाहेर हलविला. मोठ्या प्रमाणात आंबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी, शेतक-यांच्या जेवणाची व्यवस्था पणन मंडळ कार्यालयात करण्यात आले असल्याची माहिती जे. जे. जाधव यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहे.