बँकेकडे जमीन गहाण ठेवून ६४ कोटींची फसवणूक, संचालकांसह बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: February 1, 2024 04:14 PM2024-02-01T16:14:25+5:302024-02-01T16:14:41+5:30
पुणे : भागीदारी असलेल्या फर्मच्या संचालकांनी संगनमत करुन जमीन विकसनासाठी घेऊन ती बँकेकडे गहाण ठेवून ६३ कोटी ९५ लाखांचे ...
पुणे : भागीदारी असलेल्या फर्मच्या संचालकांनी संगनमत करुन जमीन विकसनासाठी घेऊन ती बँकेकडे गहाण ठेवून ६३ कोटी ९५ लाखांचे कर्ज घेतले. मात्र, विकसन करारनाम्यातील अटींची पूर्तता न करता फसवणूक केली. या प्रकरणी में. अमित एंटरप्रायजेस दि इंडीयन हौसिंग लि. च्या सर्व संचालकांसह बँकेच्या अधिकाऱ्यांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २००६ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत फिर्यादी अमित बबन बेलदरे यांचे चुलते मारुती बेलदरे यांच्या घरी, सदाशिव पेठ व सहकारनगर येथे घडला आहे.
याप्रकरणी अमित बबन बेलदरे (४०, रा. इंद्रायणी निवास, आंबेगाव बु. पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून किशोर गोविंद पाटे, राजेंद्र गोविंद पाटे, अमित एंटरप्रायजेस हौसिंग लि. चे सर्व संचालक व पदाधिकारी, एसकेपी कॉर्प लि. चे संकेत किशोर पाटे व इतर संचालक व पदाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया इंडस्ट्रीयल फायनान्स बँक, वाकडेवाडीचे तत्कालीन अधिकारी यांच्यावर फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अमित एंटरप्रायजेस दि इंडीयन हौसिंग लि. फर्ममध्ये भागीदार आहेत. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी बेलदरे यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. त्यांची आंबेगाव बु. येथील जमीन विकसन करारनामा करुन विकसनासाठी घेतली. मात्र, आरोपींनी फिर्यादी यांची दिशाभुल करुन या जमिनीत कोणतेही काम केले नाही. तसेच विकसन करारनामा व कुलमुखत्यार पत्रातील अटींची पूर्तता केली नाही. आरोपींनी बेलदरे यांची जमीन गहाण ठेवून ६३ कोटी ९५ लाखांचे कर्ज घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, याबाबत बेलदरे यांनी विचारणा केल्यावर त्यांना तुम्हाला काय करायचे ते करा, तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.