बालमजुरी कायद्याची ६४ टक्के बालकांना नाही माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:44 AM2018-06-12T03:44:40+5:302018-06-12T03:44:40+5:30
बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
- विवेक भुसे
पुणे - बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे़ जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त बालहक्क कृती गट (आर्क) यांच्या वतीने पुणे शहरातील येरवडा, विश्रांतवाडी, औंध, बिबवेवाडी व इतर विविध वस्त्यांमधील मुलांसमवेत बाल कामगार विषयावर गट केंद्रित चर्चा करून त्यांच्या सदस्य संस्थेच्या सहकार्याने एक सर्व्हे केला़ त्यात बालकांसाठी असलेल्या अनेक बाबींची मुलांनाच कल्पना नसल्याचे दिसून आले़
आंतरराष्ट्रीय कामगार संघाने १२ जून हा जागतिक बालमजुरीविरोधी दिवस म्हणून २००२पासून पाळण्यास सुरुवात केली आहे़
बालसंरक्षण हक्क म्हणजे काय हे सांगता येईल का? असे विचारल्यावर केवळ ३७ टक्के बालसंरक्षण म्हणजे काय या बद्दल माहिती होती़ ६३ टक्के मुलांना बालकांना स्वत:च्या संरक्षणासंबंधी कायदेशीर तरतुदीबद्दल माहिती नसल्याचे निदर्शनास आले़
७१ टक्के बालकांनी बालमजूर किंवा मजुरी करताना पाहिले आहे़ तसेच ८४ टक्के मुलांनी बालमजुरी अयोग्य आहे, असे सांगितले़ १२ टक्के मुलांना बालमजुरी योग्य वाटते़ बालकामगार कायद्याविषयी माहिती आहे का? असे विचारल्यावर ६४ टक्के मुलांना बालमजुरी कायदा अस्तित्वात आहे, हे माहिती नव्हते़ २२ टक्के मुलांना बालमजुरी कायद्याबद्दल माहिती होती तर, १४ टक्के मुले काहीच सांगू शकली नाहीत़ एकूण ७८ टक्के मुलांना बालहक्क कायद्याबद्दल जाणीव जागृती होण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे़ आर्कतर्फे करण्यात आलेले हे सर्वेक्षण कामगार उपायुक्तांना मंगळवारी सर्व बालकांसह जाऊन देण्यात येणार असल्याचे आर्कचे समन्वयक सुशांत सोनोने यांनी सांगितले़ यामध्ये न्यू व्हिजन, आयएससी, होप, केक़े़पीक़े़पी., निर्माण, स्वाधार आणि आयडेंटी फौंडेशन यांनी सहभाग घेतला होता़ त्यात १३ ते १७ वयोगटातील १७१ मुलांनी भाग घेतला़
७३ टक्के बालकांना बालमजुरीमुळे बालकांच्या विकासावर परिणाम होऊन त्यांना खेळ, झोप आणि आराम यापासून वंचित राहावे लागते़ ४६ टक्के मुलांना आईवडिल जे
काम करतात, ते आपण करण्यात काही चूक
वाटत नाही़
नातलग किंवा पालक बालमजुरीचे समर्थन करत असतील तर त्यांना दंड लागणे योग्य आहे का?, असे विचारल्यावर ८८ टक्के मुलांनी असा दंड करणे योग्य वाटते, असे उत्तर दिले़