पुणे शहरातील ‘65 कंटेन्मेंट झोन’ची पुनर्रचना होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 11:58 AM2020-06-01T11:58:18+5:302020-06-01T12:02:35+5:30
शहरात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता
पुणे : पुणे शहरातील 65 कंटेन्मेंट झोनमधील कोरोनाबधित रुग्णांची कमी झालेली संख्या व झोन व्यतिरिक्त भागात काही ठिकाणी आढळून आलेले रुग्ण यामुळे शहरातील कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्याचे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. तर पुणे शहराबाबतचे नवीन आदेश सोमवारी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे शहरात पाचव्या लॉकडाऊनमध्येही 97 टक्के भाग हा खुला असून, केवळ काही आस्थापना बंद आहेत. परंतु आता केंद्र व राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनुसार व आदेशानुसार शहरातील दुकाने, खाजगी कार्यालये, बाजारपेठा सुरू करण्यात येतील. राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन, काही कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात येतील. मात्र ढोले पाटील रोड, येरवडा आदी भागातील कोरोनाबधित संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येणार आहेत.
शहरात कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागात रिक्षा वाहतूक, खाजगी कार्यालये सुरू करण्याबाबत नियोजन सुरू असून याबाबतचे आदेश सोमवारी जाहीर करण्यात येतील.
----
भविष्यातील कंटेन्मेंट झोन वाढविणे किंवा कमी करणे हे आता केवळ नागरिकांच्या वर्तवणुकीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन आपले व्यवहार सुरू करणे, स्वयंशिस्त पाळणे, मास्कचा वापर करणे फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करणे जरुरी आहे. असे मत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.