Pune Crime : बिल्डरकडे ६५ लाखांची खंडणी; मारणेसह चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:55 PM2022-11-02T13:55:15+5:302022-11-02T13:57:41+5:30
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल....
पुणे : पुण्यातील बिल्डरकडे ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्या गजा मारणे टोळीतील प्रमुख गुन्हेगार रुपेश मारणे याच्यासह ४ जणांवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने हा गुन्हा दाखल केला आहे.
उमेश प्रसाद वाफगावकर (रा. यशराज अपार्टमेंट, तापोधम सोसायटी, वारजे), नितीन तुकाराम ननावरे (वय ४१, रा. विंड बिल व्हिलेज, बावधन), अनिल अंबादास लोळगे (वय ४०, रा. गोल्डफिनच पेठ, नवी पेठ, सोलापूर,) आणि रुपेश कृष्णराव मारणे (वय ३८, रा. एकता कॉलनी शास्त्रीनगर, कोथरूड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत कोथरूड येथील एका नागरिकाने खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार केली होती.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांनी बांधकाम व्यवसायासाठी उमेश वाफगावकर, रुपेश मारणे, अनिल लोळगे, नितीन ननावरे यांचेकडून १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात फिर्यादी यांनी २ कोटी ३० लाख रुपये दिले आहेत. आरोपींनी आणखी ६५ लाख रुपये मागणी केली. तसेच रुपेश मारणे याच्या सांगण्यावरून फिर्यादी यांच्या कर्वेनगर येथे बांधकाम केलेले १२ फ्लॅट करार करून सिक्युरिटी म्हणून घेतले. तसेच ते फ्लॅट विक्री करण्यास आरोपींनी अडथळा निर्माण करून फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या अर्जाची चौकशी केली असता, आरोपींनी खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णीक, अपर आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.