भामाआसखेड धरणात ६५.९८ टक्के पाणीसाठा, धरण प्रशानाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:07 PM2023-07-28T15:07:57+5:302023-07-28T15:08:38+5:30
यंदा वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आणि अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरण गतवर्षीपेक्षा सुमारे २७ टक्के कमी भरले आहे...
चाकण (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखेड वगळता सर्व धरणे ओसंडून वाहत आहेत. संततधार पाऊस असतानाही भामाआसखेड धरणात फक्त ६५.९८ टक्के पाणीसाठा आहे; तर गतवर्षी तो ९२.३७ टक्के इतका होता, अशी अधिकृत माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.
यंदा वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आणि अद्यापही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरण गतवर्षीपेक्षा सुमारे २७ टक्के कमी भरले आहे. धरणक्षेत्रात आजअखेर फक्त ४०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड, शिरूर, दौंड या तालुक्यांसह पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या काही भागांना वरदान ठरणारे भामाआसखेड हे आठ टीएमसीचे धरण आहे. सध्या एकूण साठा ५.५४ टीएमसी (१५६.७८८ दशलक्ष घनमीटर) असून ५.०६ टीएमसी (१४३.७८८ दशलक्ष घनमीटर) उपयुक्त साठा आहे.
खेड, शिरूर, दौंड या तीन तालुक्यांतील शेतकरी आणि सर्वसामान्य लोक, अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि पुणे, आळंदी, पिंपरी-चिंचवड या शहरांना पाणीपुरवठा होत आहे; परंतु परिसरातील गावे आणि चाकण शहर यांची ‘धरण उशाला - कोरड घशाला’ अशी अवस्था झाली होती. परिसरातील गावे आणि चाकण शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. आणि पुणे, आळंदी, पिंपरी या शहरांना पाणी पुरवठा असल्याने स्थानिकच अडचणीत आले होते. त्यामुळे स्थानिकांसाठीं पाणी राखीव ठेवून इतरांना पाणी द्यावे का ! जमीन देऊन आम्ही चूक केली अशा संतप्त प्रतिक्रिया बाधित शेतकरी व नागरिकांनी व्यक्त केल्या. भामाआसखेड धरणात पावसाळा सुरू होण्यापूर्वी ३० टक्के साठाही शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे आणि धरण परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने फक्त भामाआसखेड भरणे बाकी राहिले आहे .