६६६ ग्रामपंचायतीत रोहयोचे एकही काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:54+5:302021-06-10T04:07:54+5:30
उदरनिर्वाहाचा प्रश्न : अनेक ग्रामपंचायतीनी तातडीने रोहयोची कामे सुरू करण्याची केली मागणी (स्टार ७९४ डमी) पुणे : कोरोना महामारीच्या ...
उदरनिर्वाहाचा प्रश्न : अनेक ग्रामपंचायतीनी तातडीने रोहयोची कामे सुरू करण्याची केली मागणी
(स्टार ७९४ डमी)
पुणे : कोरोना महामारीच्या काळात एकीकडे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. तर दुसरीकडे अनेक गावांत रोजगार हमी योजनेचे एकही काम झालेले नाही. पुणे जिल्ह्यात ६६६ ग्रामपंचायतींनी अद्याप एकही काम सुरू केले नाही. बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांबरोबरच या ग्रामपंचायतीने देखील गावात रोहयोची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यवसायाबरोबर शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी वाढत आहे. याबाबत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीनी नव्याने अर्ज केले आहेत.
----------
पॉइंटर्स
''रोहयो''वर शुन्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती
:- ६६६
------------
रोहयोवर शुन्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती तालुकानिहाय आकडेवारी
* आंबेगाव :- ५२
* बारामती :- ७४
* भोर :- ९०
* वेल्हा :- १९
* दौंड :- ४४
* हवेली :- २०
* इंदापूर :- ७२
* जुन्नर :- ७६
* खेड :- ५६
* मावळ :- ४६
* मुळशी :- ४७
* पुरंदर :- ४३
* शिरूर :- ५५
एकूण :- ६६६
-----------
सरपंच काय म्हणतात ?
कोट
रोजगार हमी योजनेत मिळणारी रोजंदारी समान मिळावी. तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या पण बेरोजगार असलेल्या तरुणांना काम मिळावे.
- सविता अशोक माशेरे, सरपंच, अमदाबाद
----
कोट
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेवर कायमस्वरूपी काम मिळायला हवे. तसेच प्रत्येक कामगाराच्या कौशल्याप्रमाणे काम मिळायला हवे.
- राजेंद्र दाभाडे, सरपंच, पिंपरखेड
--------
हाताला काम नाही, अन ''रोहयो''ही नाही
कोट
ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस याकडे तरुण वळला आहे. मात्र, कोरोनामुळे तोही ठप्प आहे. त्यामुळे रोहयोत जॉब कार्ड काढून कौशल्याप्रमाणे काम मिळावे.
- सुधीर पुंडे, कान्हूर मेसाई
---
तरुणांनी ग्रामीण भागात पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. यात संपूर्ण कुटुंब काम करत आहे. मात्र कोरोनामुळे तेही बंद आहेत. पोल्ट्री चालकांनाही रोहयोत काम मिळावे.
-शरद उघडे, कवठे येमाई
-----
अधिकारी कोट
वैयक्तिक लाभाच्या योजनांवर आपण भर देत आहोत. कोरोनाकाळात प्रत्येक कुटुंबात काम देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी नरेगा आयुक्तांना वाढीव बजेट सादर केले आहे.
- संजय तेली, उपजिल्हाधिकारी, रोहयो