उपमहापौरांच्या पुतण्यावर पालिकेचा ६७ लाख खर्च
By admin | Published: September 10, 2015 04:12 AM2015-09-10T04:12:33+5:302015-09-10T04:12:33+5:30
उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या पुतण्याच्या आजारपणावर महापालिकेने ६७ लाख खर्च केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. पालिका प्रशासनाने बिले मंजूर
पिंपरी : उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या पुतण्याच्या आजारपणावर महापालिकेने ६७ लाख खर्च केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. पालिका प्रशासनाने बिले मंजूर करण्यापूर्वी सर्व खर्चाला राज्य सरकारची मंजुरी घेतली नसल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे.
उपमहापौर वाघेरे यांचा भाऊ महापालिकेत मजूर म्हणून कार्यरत आहे. पिंपळे सौदागर येथे ७ मे २०१४ रोजी त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्यानंतर त्या मुलास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्याऐवजी थेरगावातील बिर्ला रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी या मुलाच्या उपचारासाठी आयुक्तांनी ५ लाख ३ हजार सातशे रुपये, पंधरा दिवसांनी ६ लाख ७४ हजारांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. त्यानंतर २५ मे २०१५पर्यंत तब्बल ६७ लाख ९९ हजार ७२५ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. या मुलाचा जून महिन्यात मृत्यू झाला. वैद्यकीय उपचारावर खर्च करताना आयुक्तांनी राज्य शासनाची मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता स्वत:च्या अधिकारात बिले मंजूर केली. अपघातानंतर संबंधित तरुणाला पालिके ऐवजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर एवढा खर्च महापालिका करणार का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते सुंदर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
स्पीडब्रेकरने आमच्या इंजिनियर मुलाचा जीव घेतला. त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेले. तो महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचार बिल परिपूर्ती या सदरातून मदत केली आहे. ती नियमबाह्य नाही. मुलाच्या कुटुंबीयांच्या दु:खावर मीठ चोळण्याचा प्रकार चुकीचा आहे.
- प्रभाकर वाघेरे (उपमहापौर)
महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी असणाऱ्या वैद्यकीय उपचार बिलांबाबत मंजुरीच्या तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांना मदत केली जाते. त्यात कोणताही दुजाभाव केला जात नाही. ज्या वेळी पेशंट उपचार घेत असतो, त्या वेळी त्यास तातडीने मदत होणे गरजेचे असते, याच भावनेतून मदत केली.
- राजीव जाधव (आयुक्त, मनपा)