भोर तालुक्यात ६७ टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 02:07 AM2017-02-22T02:07:11+5:302017-02-22T02:07:11+5:30
भोर तालुक्यातील २२२ मतदान केंद्रांपैकी ६ केंद्रांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे २१६ केंद्रांवरच मतदान
भोर : भोर तालुक्यातील २२२ मतदान केंद्रांपैकी ६ केंद्रांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे २१६ केंद्रांवरच मतदान झाले. तालुक्यातील सर्व केंद्रांवर सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत १२ टक्के, ९.३० ते ११.३० पर्यंत २७ टक्के, ११.३० ते १.३० पर्यंत ५१ टक्के आणि ३.३० वाजता ५६ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ६७ टक्के मतदानाचा अंदाज आहे.
वीसगावमधील नेरे, खानापूर, बाजारवाडी, बालवडी, हातनोशी, उत्रौली, तर कर्नावड, आंबवडे, रायरी, भोलावडे, हातवे, किकवी या गावात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. निवडणुकीत कोणताच अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नसरापूर, भोलावडे, केळवडे, हातवे, उत्रौली, नेरे, बालवडी, किकवी या गावात अधिक प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाटघर धरण भागात नागरी सुविधा झाल्या नसल्याने पाच गावांतील १३३० मतदारांनी मतदान केले नाही. भुतोंडे मतदान केंद्रावर (०), खुलशी (०), गृहिणी (०), चांदावणे (०), कुंबळे व बोपे (०) टक्के मतदान झाले. या भागातील फक्त डेरे गावात ९५ मतदान झाले.
येथील खिळदेववाडीने मतदान केले नाही. आदिवासी महादेव कोळी समाजाने विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तहसीलदार वर्षा शिंगण, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी कारी, कोळेवाडीत जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु मतदारांनी मतदान केले नाही.
धानवली गावातील मतदान केंद्रावर (०), तर कारी कोळेवाडी सांगवी वे. खो, नांदघुर पसुरे जयतपाड या गावात महादेव कोळी समाजाच्या लोकांनी मतदानात भाग घेतला नाही. सुमारे ४५० मतदारांनी बहिष्कार टाकला. (वार्ताहर)