Pune: कुकडी प्रकल्पांतर्गत आठ धरणामध्ये ६७.४० टक्के पाणी साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:28 PM2023-08-09T18:28:43+5:302023-08-09T18:30:01+5:30
डिंभे ८३, तर येडगाव ९७ टक्के भरले...
नारायणगाव (पुणे) : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी डिंभे ८३ टक्के, तर येडगाव धरण ९७ टक्के टक्के भरले असून कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या आठ धरणांमध्ये आजमितीला २० टीएमसी (६७.४० टक्के) पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १.१३ टीएमसी कमी आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र.०१ चे कार्यकरी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने डिंभे ८३ टक्के, तर येडगाव धरणे ९७ टक्के भरले असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत जुन्नर तालुक्यातील वडज, माणिकडोह, चिल्हेवाडी ही धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरलेली आहेत. मात्र, पिंपळगाव जोगा ४२.४३ टक्के, विसापूर धरण केवळ ८.५६ टक्के आणि घोड २४.३१ टक्केच भरले आहे. आजच्या मितीला सर्व धरणांत २०००२.२७ द.ल.घ. फूट ( ६७.४० % ) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला २१३२८.१५ द.ल.घ. फूट ( ७१.२८ % ) पाणीसाठा उपलब्ध होता.
कुकडी प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील ६ धरणांचा उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी तसेच झालेल्या पावसाचे प्रमाण :
येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा १८८१.२७ द.ल.घ. फूट ( ९६.७८ % ) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर १३५ मि.मी. पाऊस झालेला आहे. २४ तासांत २ मि.मी. पाऊस झालेला आहे. या धरणातून कालवा द्वारे १०७ कुसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा ५३१९ ( ५२.२५ % ) द.ल.घ. फूट पाणीसाठा उपलब्ध आहे, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १ जूनपासून आजअखेर ३४९ मि.मी. पाऊस झालेला असून २४ तासांत १ मि.मी. पाऊस झालेला आहे.
वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये उपयुक्त पाणीसाठा ८०४ द.ल.घ. फूट ( ६८.५३ % ) झाला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर २५० मि.मी. पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे. पिंपळगाव जोगा धरणाच्या क्षेत्रामध्ये १६५० द.ल.घ. फूट ( ४२.४३ % ) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ०१ जूनपासून आजअखेर ३८० मि.मी. पाऊस झालेला आहे. २४ तासांत १ मि.मी. पाऊस झालेला आहे.
आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात १०३४६ द.ल.घ. फूट ( ८२.८१ % ) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ३६४ मि.मी. पाऊस झालेला आहे. २४ तासांत २ मि.मी. पाऊस झालेला आहे. चिल्हेवाडी धरणाच्या क्षेत्रामध्ये ६२३ द.ल.घ. फूट ( ७७.६२ % ) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ०१ जूनपासून आजअखेर ३५७ मि.मी. पाऊस झालेला आहे.