''या'' जुन्या नव्या दिग्गजांच्या सुरावटीने सजणार सवाईचा स्वरयज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 08:25 PM2019-11-19T20:25:04+5:302019-11-19T20:28:23+5:30
संगीत मार्तंड पं. जसराज, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम अशा दिग्गज कलावंतांसह संदीप भट्टाचार्य, मनोज केडिया व मोर मुकुट केडिया, अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसकर व अनुजा बोरुडे, विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार अशा प्रथमच सादरीकरण करणाऱ्या प्रतिभावंत कलाकारांच्या अविष्कारांची मेजवानीने यंदाचा ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सजणार आहे.
पुणे : संगीत मार्तंड पं. जसराज, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम अशा दिग्गज कलावंतांसह संदीप भट्टाचार्य, मनोज केडिया व मोर मुकुट केडिया, अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसकर व अनुजा बोरुडे, विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार अशा प्रथमच सादरीकरण करणाऱ्या प्रतिभावंत कलाकारांच्या अविष्कारांची मेजवानीने यंदाचा ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सजणार आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यंदाच्या वर्षी ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ दि. ११ ते १५ डिसेंबरदरम्यान, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. महोत्सवात कला सादर करणारे कलाकार व वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
दि़ ११ ते १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० तर, चौथ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. १४) दुपारी ४ ते रात्री १२ तसेच, शेवटच्या दिवशी रविवारी (दि. १५) महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत महोत्सवाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे.
बुधवारी (दि. ११) सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांचे गायन, जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन आणि पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाने होणार आहे़
गुरुवारी (दि़ १२) दुसऱ्या दिवशी उस्ताद मशकुर अली खान यांचे शिष्य व किराणा घराण्याचे संदीप भट्टाचार्जी यांचे गायन, झारखंडचे केडिया बंधू म्हणून ओळखले जाणारे मनोज केडिया व मोर मुकट केडिया या बंधूंचे सरोद व सतार वादन व जयपूर घराण्याचे गायक वामनराव देशपांडे यांच्या शिष्या मंजिरी कर्वे -आलेगावकर यांचे गायन होणार आहे. पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने याची सांगता होणार आहे़
शुक्रवारी (दि. १३) तिसऱ्या दिवशी ‘धृपद सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व पं. रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा यांच्या शिष्या अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर आणि अनुजा बोरुडे यांचे सादरीकरण होईल. यावेळी अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर यांचे धृपद गायन तर अनुजा बोरुडे यांचे पखवाज वादन, पं. भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे शिष्य व सुपुत्र विराज जोशी यांचे गायन, ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य केन झुकरमन यांचे सरोदवादन होणार आहे. मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने समारोप होईल. रविवारी ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या स्वरांनी महोत्सवाची सांगता होईल.