राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयाला ६८ कलाकार अनुपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:47 PM2018-05-03T15:47:21+5:302018-05-03T15:47:21+5:30
आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयामध्ये केवळ ११ पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिले जाणार असून, उर्वरित पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कलाकारांकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर शेखर कपूर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार नसल्याने ६८ कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे थोड्याच वेळात नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात वितरण होणार आहे. गेल्या ६४ वर्षांपासून हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्याची परंपरा आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या हस्ते अकराच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उर्वरित पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहे. यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर आपल्या कलेची मोहर उमटविणा-या कलाकारांनी शासनाच्या अनागोंदी कारभारावर टीका केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने कलाकारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची भूमिका असलेला ‘कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला आहे.
..................