Pune | जिल्ह्यातील ६८ हजार सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 08:35 PM2023-03-13T20:35:36+5:302023-03-13T20:36:41+5:30
कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाचीही तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारीकर्मचारी मंगळवारपासून (दि. १४) बेमुदत संपावर जाणार असून, जिल्ह्यातील सर्व सरकारी विभागांतील सुमारे ६८ हजार कर्मचाऱ्यांचा त्यात सहभाग असणार आहे. याचा कामकाजावर परिणाम होणार असल्याचा दावा एकीकडे सपंकरी कर्मचारी संघटनांनी केला असला, तरी वर्ग एक व दोनचे अधिकारी कामावर असल्याने कामावर परिणाम होणार नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या कर्मचारी संघटनेची बैठक निष्फळ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विभागांतील ६८ हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे यांनी सांगितले. तर जिल्हा प्रशासनातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी यात सहभागी होणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली.
सपंता सहभागी झालेले कर्मचारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जमून त्यांनतर मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात जमणार आहेत. येथे सर्व विभागाचे कर्मचारी जमा होतील. त्यानंतर सभा होऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे विनायक राऊत यांनी दिली.