६८ वर्षाच्या आजीबाईंनी पकडले सोनसाखळी चोरट्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:14 AM2021-03-01T04:14:21+5:302021-03-01T04:14:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रात्री पतीबरोबर वॉकिंग करत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्याने ६८ वर्षाच्या आजीबाईंच्या गळ्यातील दागिने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रात्री पतीबरोबर वॉकिंग करत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्याने ६८ वर्षाच्या आजीबाईंच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्या चोरट्याची कॉलर पकडली. आजीबाईंना पतीच्या व नागरिकांच्या मदतीने मोटारसायकलस्वाराला पकडण्यात यश आले.
बाणेर येथील अल्बासिटा सोसायटीजवळील रस्त्यावर शनिवार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला.
दयानंद आश्रुबा गायकवाड (वय २६, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे या पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार पळून गेला.
याप्रकरणी नुरुमा ऊर्फ गिता बावणे (वय ६८, रा. बाणेर) यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गीता बावणे या त्यांच्या पतीसह शनिवारी रात्री फिरायला बाहेर पडल्या होत्या. मुरकुटे गार्डन रस्त्यावरुन ते जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५६ हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून मोटारसायकलवर बसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रसंगावधान राखून गीता यांनी या चोरट्याच्या पाठोपाठ जाऊन त्यांची कॉलर पकडली. पण ताे हिसका देऊन पळून गेला. मात्र, गीता व त्यांच्या पतीने आरडाओरडा केला. त्यांच्या पतीने चोरट्याच्या मोटारसायकलला ढकलून देत खाली पाडले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे नागरिक धावत आले व त्यांनी मोटारसायकलस्वार चोरटा दयानंद गायकवाड याला पकडले. त्याचवेळी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे मार्शल तेथून जात होते. गायकवाड याला त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळावरुन मोटारसायकल व अर्ध मंगळसूत्र जप्त केले आहे.