आमदारांच्या गावातच विनापरवाना सहावी, सातवीचे वर्ग; वर्ग बंद करण्याचे झेडपीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 01:48 PM2023-02-02T13:48:08+5:302023-02-02T13:49:19+5:30
वर्ग सुरू राहिल्यास शिरूरचे गटशिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक हे जबाबदार असे या आदेशात म्हटले
पुणे : शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या वडगाव रासाई गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत विनापरवाना गेल्या दोन वर्षांपासून सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेला वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हे दोन्ही वर्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे वर्ग सुरू राहिल्यास शिरूरचे गटशिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक हे जबाबदार असतील, असेही या आदेशात म्हटले आहे.
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून विनापरवाना सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर समोर आले आहे. वडगाव रासाई येथे असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती विद्यालय आहे. त्या ठिकाणी ५ वी ते १० वीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. मात्र, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन वर्ग भरविण्यात आले. झेडपीच्या सहावीच्या वर्गात ३०, तर सातवीच्या वर्गात २१ मुले शिकत आहेत. या विद्यार्थ्यांची संगणक प्रणालीमध्ये कुठेही नोंद आढळून येत नाही.
यासंदर्भात माजी अध्यक्ष प्रदीप कंद, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांच्यासह काही स्थानिक ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर हा प्रकार उघडकीस आणला. इतकेच नाही, तर शाळेत मुबलक शिक्षक उपलब्ध नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, गावात इतर संस्थेची शाळा उपलब्ध असूनही विनापरवाना वर्ग सुरू ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी असे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले. त्यानंतर या शाळेची पाहणी केल्यानंतर विनापरवाना सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू असल्याचे समोर आल्याने हे दोन्ही वर्ग बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. तसेच या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुख्याध्यापकच जबाबदार
जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यासाठी पटसंख्या आणि अंतराचे निकष आहेत. त्यानुसार वडगाव रासाई शाळेला नियमानुसार पाचवीचे वर्ग सुरू करण्यास काही अटी व शर्तीवर परवानगी २०२१ मध्ये दिली आहे. त्यानंतर विनापरवाना सहावी आणि सातवीचे वर्ग सुरू असल्याचे समोर येताच हे दोन्ही वर्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याध्यापकांकडे खुलासा मागविण्यात आला असून, याला मुख्याध्यापकच जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी या विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.
''आमदार अशोक पवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी राजकीय दबाव वापरून चुकीच्या पद्धतीने विनापरवाना वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने आम्ही सातत्याने याला विरोध केला. परंतु वर्ग सुरूच ठेवले. अखेर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर हे दोन्ही वर्ग विनापरवाना सुरू असल्याचे समोर आल्याने ते बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. - सचिन शेलार सरपंच, वडगाव रासाई.''