अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करणाऱ्या ७ जणांना अटक; वाकडेवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 03:08 PM2020-09-15T15:08:31+5:302020-09-15T15:09:45+5:30
वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनीत महापालिकेने सोमवारी अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेतली होती.
पुणे : वाकडेवाडी येथील पी एम सी कॉलनीतील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला शिवीगाळ करुन दगडफेक करणाºया ७ जणांना खडकी पोलिसांनीअटक केली आहे.
संदीप मुकुंद तारु (वय ३४), सुहास नामदेव लोंढे, कुमार बाबु ओव्हाळ (वय २०), अंकुश खंडु गायकवाड (वय ३३), नामदेव खंडु लोंढे (वय ५५), पुनम दिलीप भिसे (वय २०), प्रियंका किरण लोंढे (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.याशिवाय आणखी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून राकेश यलप्पा विटकर यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनीत महापालिकेने सोमवारी अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेतली होती. कॉलनीत घराबाहेर उभारण्यात आलेल्या शेड पाडण्यात आल्या. यामध्ये २५ ते ३० ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी मनपा अधिकारी व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे काम करत असताना लोकांनी बेकायदा जमाव जमवून अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांनी दगडफेक केल्याने अतिक्रमण कारवाई थांबवावी लागली. शासकीय कामात अडथळा आल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम कणसे अधिक तपास करीत आहेत.