स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण आढळले
By admin | Published: February 26, 2015 03:18 AM2015-02-26T03:18:32+5:302015-02-26T03:18:32+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उकाडा वाढूनही स्वाइन फ्लूचे रुग्ण शहरात आढळत आहेत. आज बुधवारी दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात अनुक्रमे
पिंपरी : उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उकाडा वाढूनही स्वाइन फ्लूचे रुग्ण शहरात आढळत आहेत. आज बुधवारी दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात अनुक्रमे ४ व ३ असे एकूण ७ स्वाइन फ्लूबाधित रुग्ण आढळले. या आजाराची लक्षणे असलेली १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ५ हजार १०८ जणांची तपासणी करण्यात आली.
या आजारामुळे शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे ७ जणांचे प्राण गेले आहेत. सोमवारी (दि. २३) कामगारनगर, पिंपरी येथील एका महिलेचा पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या १५ रुग्णांसह स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण बुधवारी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले.
स्वाइन फ्लू रुग्णांची एकूण ३७ संख्या झाली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ५ हजार १०८ जणांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. १ जानेवारी ते २५ फेबु्रवारी या कालावधीत बुधवारपर्यंत १ लाख ७८ हजार ८३४ जणांची तपासणी झाली. त्यांपैकी १९ हजार ६६५ जणांनी सर्दी, खोकला, ताप संबंधी आजारावर उपचार घेतले. बुधवारी त्यातील १ हजार २०१ जणांनी उपचार घेतले. एकूण ३१९ जणांना बुधवारी टॅमिफ्लू औषध देण्यात आले. ही संख्या एकूण २ हजार ८५१ वर पोहचली आहे. एकूण २२ जणांचे थुंकीचे
नमुने तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांतील ७ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे उघड झाले. आतापर्यंत एकूण २०८ जणांच्या थुंकीचे नमुने घेतले गेले आहेत.
थेरगावच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या सर्वाधिक ११ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
९ आणि इतर ७ खासगी
रुग्णालयांत स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण उपचार घेत आहेत.(प्रतिनिधी)