चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ७ कोटींचा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 03:42 PM2019-09-24T15:42:08+5:302019-09-24T16:02:43+5:30
चतु:श्रृंगी मंदिर हे सुमारे २०० वर्षे जुने स्वयंभु देवस्थान आहे़...
पुणे : चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मंदिर समितीने ७ कोटी रुपयांचा प्रकल्पाची आखणी केली असून त्याचे काम दिवाळीनंतर सुरु करण्यात येणार आहे़. यामध्ये प्रामुख्याने मंदिर परिसरातील सुशोभिकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकता जिना (एक्सस्लेटर), ध्यान मंदिर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सभामंडपाचे विस्तारीकरण याचा समावेश आहे, असे चतु:श्रृंगी मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दिलीप अनगळ यांनी सांगितले़.
चतु:श्रृंगी मंदिर हे सुमारे २०० वर्षे जुने स्वयंभु देवस्थान आहे़. नवरात्रीनिमित्त येथे यात्रा भरत असून देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीच्या काळात सुमारे अडीच लाख भाविक येत असतात़. गेल्या काही वर्षांंपासून मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मंदिर ट्रस्टचे प्रयत्न सुरु आहेत़. या संपूर्ण परिसराचे लँडस्केप डिझाईन वर्षा व रवी गवंडी यांनी केले असून ऑकिटेक्ट नरेंद्र डेंगळे यांनी प्रकल्पाची आखणी केली आहे़. यापूर्वी येथे रोपवे उभारण्याचा प्रस्ताव होता़. पण, त्यादृष्टीने उंची कमी असल्याने त्याऐवजी एक्सस्लेटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़. याशिवाय मंदिराच्या सभामंडपाचे विस्तारीकरण करुन तो पुढच्या बाजूने थोडा उंच करण्यात येणार आहे़. त्यामुळे तेथून भाविकांना थेट देवीचे दर्शन होऊ शकेल़.
चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्र उत्सव २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणार असून २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे़. मंदिरात दररोज सकाळी १० व रात्री ९ वाजता महाआरती होणार आहे़. गणपती मंदिरात रोज दुपारी भजने होणार आहेत़. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता नवचंडी होम होणार आहे़.
यंदा नवरात्री उत्सवात स्तनपात कक्षाची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे़. पूजा व प्रसाद साहित्याचे पाच स्टॉल असणार आहेत़. पोलीस, होमगार्ड, खासगी रक्षक, तसेच मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक असणार आहे़. व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक असून २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़.
नवरात्रीत रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था असून भाविकांना दर्शन घेऊन लवकर बाहेर पडता यावे, यासाठी बॅरिकेटची व्यवस्था आहे़. या काळात २४ तास रुग्णवाहिका राहणार असून ६ डॉक्टर प्रत्येकवेळी उपस्थित असणार आहेत़. याठिकाणी औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत़. चतु:शृंगी मंदिर ट्रस्टतर्फे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी ३ लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री रिलिफ फंडाला देण्यात आली असल्याचे अनगळ यांनी सांगितले़.