पालिकेच्या खोदकामात तुटल्या ७ वीजवाहिन्या
By admin | Published: May 12, 2017 05:29 AM2017-05-12T05:29:56+5:302017-05-12T05:29:56+5:30
पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात तुटलेल्या येरवड्यामधील चार वीजवाहिन्यांची दुरुस्ती केल्यानंतर, अवघ्या १२ तासांतच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात तुटलेल्या येरवड्यामधील चार वीजवाहिन्यांची दुरुस्ती केल्यानंतर, अवघ्या १२ तासांतच त्याच खोदकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाणी व सुरू असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पुन्हा सात वीजवाहिन्या तुटल्या. परिणामी वाडिया व बंडगार्डन परिसरात विजेच्या भारव्यवस्थापनासाठी तीन तासांचे चक्राकार पद्धतीने दिवसभर भारनियमन करावे लागले. दरम्यान, खोदकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
येरवड्यामधील डॉ. आंबेडकर चौकात पुणे महानगरपालिकेकडून पावसाळी ड्रेनेज पाइपलाइन टाकण्यासाठी जेसीबीने खोदकाम काम सुरु आहे. मंगळवारी (दि. ९) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास या खोदकामात चार वीजवाहिन्या तुटल्याने वाडिया व बंडगार्डन परिसरात भारनियमन करावे लागले होते. याशिवाय विश्रांतवाडी परिसरातील काही भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. या तुटलेल्या चारही वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम बुधवारी (दि. १०) दुपारी अडीच वाजता पूर्ण झाले. परंतु अवघ्या १२ तासांच्या कालावधीनंतर त्याच खोदकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी वाढल्याने व सुरू असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी पहाटे चार वाजता पुन्हा सात वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे नायडू उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या जहाँगिर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, कॉनरॅड हॉटेल, ताडीवाला रोड, ढोले पाटील रोड, मंगलदास रोड, नालोर रोड, प्रायव्हेट रोड, आरटीओ आॅफिस परिसर, लडकतवाडी, सोहराब हॉल, बंडगार्डन रोड, बोट क्लब रोड आदी परिसरातील ९ हजार वीजग्राहकांना फटका बसला. या परिसरात आज पुन्हा तीन तासांच्या चक्राकार पद्धतीचे भारनियमन करावे लागले.
रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांनी उपस्थित राहून दुरुस्ती काम सुरु केले. या वीजवाहिन्यांची दुरुस्ती आज मध्यरात्रीनंतर पूर्ण होईल.
या सर्व प्रकारात महावितरणचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे महानगरपालिकेच्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध महावितरणकडून येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.