पिंपरीत पकडला ७ लाखांचा 'तब्बल ३० किलो' गांजा; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:37 AM2021-11-23T10:37:09+5:302021-11-23T10:37:27+5:30
पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथून दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले
पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या भुजबळ चौकात तब्बल ७ लाखाहूनही अधिक किंमतीचा तब्बल ३० किलो गांजा पकडण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी बाळू महादेव वाघमारे (वय ३१ , रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड), रवींद्र प्रकाश घाडगे (वय २३, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड. मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ चौकात दोघेजण प्रवासी बॅगमध्ये गांजा घेऊन आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथून बाळू आणि रवींद्र यांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या प्रवासी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. सात लाख ५४ हजार ५७५ रुपये किंमतीचा ३० किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला. बाळू आणि रवींद्र हे वेगवेगळ्या प्रवासी बॅगमध्ये गांजा आणून त्याची विक्री करत होते.