पुण्यात पोलीस असल्याचे भासवून तरुणीचे ७ लाख लांबवले
By भाग्यश्री गिलडा | Published: May 27, 2023 05:05 PM2023-05-27T17:05:12+5:302023-05-27T17:05:58+5:30
आधार कार्ड मागितल्यानंतर चार गुन्हेगार तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करत असल्याचे अज्ञात व्यक्तीने तरुणीला सांगितले.
पुणे : पोलीस डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून २६ वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बालेवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी दिल्ली भागातील असल्याचा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. '
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने तरुणीला फोन करून 'तुमच्या नावे एक पार्सल पाठवले आहे, ते जर तुम्ही पाठवले नसेल तर लगेचच पोलिसांना कळवा' असे सांगितले. त्यांनतर पोलीस डिपार्टमेंट मध्ये फोन ट्रान्स्फर करतो असे सांगून तरुणीचा फोन बनावट मोबाईल नंबरवर ट्रान्स्फर केला. पोलीस बोलत असल्याचे भासवून तरुणीला स्काईप अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून तरुणींकडून आधार कार्ड मागितले.
आधार कार्ड मागितल्यानंतर चार गुन्हेगार तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करत असल्याचे अज्ञात व्यक्तीने तरुणीला सांगितले. तुमचे बँक अकाउंटची चौकशी करायची आहे असे सांगून सगळे पैसे ट्रान्स्फर करावे लागणार असल्याचे सांगून तपास पूर्ण झाल्यांनतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील असे सांगत तरुणीच्या खात्यातील एकूण ६ लाख ९९ हजार ५२९ रुपये ट्रान्स्फर करून घेतले. या प्रकारांनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाणे गाठत झालेल्या प्रकारची फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक चिंतामण अंकुश हे करत आहेत.