पुणे सातारा महामार्गाजवळ सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 20:18 IST2022-08-09T20:17:55+5:302022-08-09T20:18:10+5:30
अज्ञात चोरट्यांच्या विरोधात राजगड पोलिसात गुन्हा दाखल

पुणे सातारा महामार्गाजवळ सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास
खेडशिवापूर : वेळू येथील पुणे सातारा महामार्गानजीकच्या असलेल्या सेंट्रल बँकेचे ‘एटीएम’ मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील ७ लाख ९६ हजारांची रोकड चोरट्यांन कडून लंपास केली आहे. मंगळवारी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात राजगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळू येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेच्या बाहेर काही वर्षांपासून बँकेचे एटीएम मशिन आहे. ९ ऑगस्टला पहाटे च्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ‘एटीएम’ कापून त्यातील ७ लाख ९६ हजार रुपये चोरून पोबारा केला. ही चोरी झाल्याचे लक्षात येताच, पोलिसांना कळविल्यानंतर राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व माहिती घेतली चोरांचा माग काढण्यासाठी श्वानाला ही पाचारण करण्यात आले होते. त्याने ससेवाडी गावच्या हद्दीपर्यंतचा मार्ग दाखवला असून तपासासाठी राजगड पोलिसांनी दोन पथक तयार केली असल्याची माहिती राजगड पोलिसानच्या वतीने देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पुढील तपास पो उप निरीक्षक श्रीकांत जोशी हे करत आहेत.
बँकेने आपल्या बँकेच्या परिसरामध्ये चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही व लाईट लावणे आवश्यक आहे त्याचबरोबर बँकेच्या बाहेर सुरक्षारक्षक असणेही गरजेचे आहे यासंदर्भात चा पत्रव्यवहार सदर बॅंकेशी करण्यात आला होता मात्र संबंधित सूचनाकडे बँकेने दुर्लक्ष केले असल्याची माहिती राजगड चे पो निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.