तुमच्या मोबाईल क्रमांकावरून बेकायदेशीर जाहिराती जात असल्याची भीती दाखवून ७ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: May 26, 2024 02:45 PM2024-05-26T14:45:40+5:302024-05-26T14:45:56+5:30
पुढील कारवाई टाळायची असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून ६ लाख ९३ हजार रुपयेही उकळले
पुणे : पुढील दोन तासात तुमचा मोबाईल क्रमांक ब्लॉक होणार आहे. त्यावरून बेकायदेशीर जाहिराती आणि त्रासदायक फोन कॉल्स केले जात असल्याची भीती दाखवून एकाची ७ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अपूर्व खन्ना (वय- ४०, रा. बाणेर) यांनी शनिवारी (दि. २५) चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार हा प्रकार २२ मे रोजी घडला आहे. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन येऊन टेलिकॉम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा हा मोबाईल क्रमांक पुढील २ तासांत ब्लॉक होणार आहे. तसेच तुमच्या आधारकार्डवर एक मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे. त्यावरून बेकायदेशीर जाहिराती आणि त्रासदायक फोन केले जात आहेत असेही सांगितले. तुमच्याविरोधात एका महिलेने एफआयआर दाखल केली आहे. त्याच्या इन्व्हेस्टीगेशन संदर्भात तुम्हाला फोन केला असल्याचे सांगून भीती दाखवली. पुढील कारवाई टाळायची असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून फिर्यादींकडून ६ लाख ९३ हजार रुपये उकळले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नांद्रे करत आहेत.