सॉफ्टवेअर कंपनीतील ७० लाखांचे साहित्य चोरटे जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:27 AM2021-02-20T04:27:23+5:302021-02-20T04:27:23+5:30
पुणे : कल्याणीनगर येथील एच. एस. बी. सी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या कंंपनीतील ७० लाखांचे तब्बल १२० वायफाय ॲक्सेस पॉईंट ...
पुणे : कल्याणीनगर येथील एच. एस. बी. सी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या कंंपनीतील ७० लाखांचे तब्बल १२० वायफाय ॲक्सेस पॉईंट व ॲक्सेस स्विच चोरी करून त्याची विक्री करणा-यांना दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश धोंडीराम डोलारे (वय ३१, रा. अरविंद हाईटस, नर्हे), कुलदीप रामकरण चौहान (वय ३३, रा. बांद्रा ईस्ट, मुंबई) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
याप्रकरणी कंपनीचे नेटवर्क इंजिनियर मकरंद मधुकर बेलुलकर (रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यांचा तपास करत असताना तेथे वायरिंगचे काम केलेल्या गणेश डोलारे याने ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. चोरीचा माल मुंबई येथील चौहान याला विकल्याचे सांगितले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे,कर्मचारी किरण घुटे, अमजद शेख, नवनाथ मोहिते यांनी बांद्रा येथून चौहानला ताब्यात घेऊन त्याच्याकडील ५२ लाख ५० हजाराचे नेटवर्किंगचे साहित्य जप्त केले.
---
युनिट गायब झाल्याचे कंपनीच्या लक्षात आल्यानंतर दिली तक्रार
एका नामांकित कंपनीला एच.एस.बी.सी या कंपनीतील वायरिंगचे काम मिळाले होते. त्यानुसार गणेश डोलारे हा तेथे काम करण्यासाठी जात होता. दरम्यान बांद्रा येथील चौहान हा गणेश डोलारेच्या संपर्कात होता. त्याने गणेशला असे काही साहित्य तुला मिळाले तर मी विकत घेतो असे सांगितले होते. एके दिवशी काम करत असताना, डोलारेला कंपनीच्या बेसमेंटमध्ये वायफाय अॅक्सेस पाईंट व स्वीच दिसले. त्यानंतर त्याने सप्टेंबर २०२० पासून तो दररोज दोन चार युनिट चोरुन नेत होता. अशा प्रकारे त्याने तब्बल १२० युनिट चोरी केले. प्रत्येकी युनिटची किंमत ३५ हजाराच्या घरात आहे. चोरी केलेले सर्व युनिट त्याने चौहानला विकले. दरम्यान युनिट गायब झाल्याचे कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.