सहकारनगर मधील वरिष्ठ निरीक्षकासह ७ जण निलंबित, पोलिस आयुक्तांचा रुद्रावतार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:32 PM2023-06-29T22:32:36+5:302023-06-29T22:32:51+5:30
दोन गटातील दंगल भोवली
पुणे : सहकारनगरमध्ये दोन गटात झालेल्या तोडफोडीच्या घटनेची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्यांची गांभीर्याने दखल न घेतल्याने दंगलीचा प्रकार घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलिस निरीक्षकासह ७ जणांना तडकाफडकी निलंबित केले आहे. एकाच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसह ७ जणांचे निलंबन करण्याची गेल्या काही वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.
जून महिन्यात एकूण ४ अदखलपात्र गुन्ह्यांतील आरोपी, फिर्यादीवर कठोर कारवाई व प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली नाही. इतरांकडून कारवाई करुन घेतली नाही, म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांच्यावर कारवाई केली.
तसेच पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व तपास प्रमुख, उपनिरीक्षक तसेच पोलिस हवालदार, पोलिस शिपाई यांनी या तक्रारीची गांर्भीयांनी न घेतल्यामुळे हे दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांची तात्काळ नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली होती.