चिंचवडला ७ पिस्तूल जप्त; तिघांना अटक
By admin | Published: December 24, 2014 01:28 AM2014-12-24T01:28:54+5:302014-12-24T01:28:54+5:30
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची तब्बल सात पिस्तुले आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पिंपरी : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीची तब्बल सात पिस्तुले आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई सोमवारी रात्री चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे करण्यात आली.
संतोष विलास मोरे (वय ३३, रा. सिंहगड रोड, वडगाव धायरी), सुनील अनंता पिसाळ (वय २९, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी), गणेश किरण खानापुरे (वय २६, रा. गुरुवार पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिस्तूल विक्रीसाठी संतोष मोरे चिंचवडला येणार असल्याची माहिती हवालदार शाकीर जिनेडी यांना मिळाली होती. त्यानुसार आॅटो क्लस्टर येथे सापळा रचण्यात आला. त्यानंतर पिस्तूल विक्रीसाठी आलेला मोरे व विकत घेण्यासाठी आलेला पिसाळ या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता सहा लाख ३ हजार रुपये किमतीची देशी बनावटीची तब्बल ६ पिस्तूल व ३० काडतुसे त्यांच्याकडे सापडली.
मोरे याच्याकडे सखोल चौकशी केली असता, दोन दिवसांपूर्वी गणेश खानापुरे याला पिस्तूल विकल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर खानापुरे याला ताब्यात घेऊन देशी बनावटीचे पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे व मोटार जप्त केल्याची माहिती उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली. हत्यारे कोठून आणली, कोणासाठी आणली, गोळीबाराच्या घटनांशी त्यांचा
काही संबंध आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे उपायुक्त माने म्हणाले.(प्रतिनिधी)