Pune: चार महिन्यांत ७ हजार ५५७ जणांनी काढले ई रेशनकार्ड
By नितीन चौधरी | Published: September 18, 2023 05:37 PM2023-09-18T17:37:14+5:302023-09-18T17:37:52+5:30
सरकारने १७ मेपासून सामान्यांना ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली...
पुणे : शहरात नव्याने रेशन कार्ड हवे असल्यास ते आता ऑनलाईन आणि निशुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांत सुमारे ७ हजार ५५७ जणांनी ई रेशनकार्डचा लाभ घेतला आहे. मात्र, याविषयी अनभिज्ञ असलेल्या नागरिकांना अजुनही एजटांचा विळखा कायम असून त्यांची आर्थिक लूट होत आहे.
रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एजंटांना हाताशी धरावे लागत होते. अनेक तहसील कार्यालयांमध्ये तसेच परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला होता. त्यात अनेक अधिकारीदेखील सामील होते. त्यामुळे सामान्यांना वीस रुपयांत मिळणारे रेशन कार्ड काढण्यासाठी दोन हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत होते. याला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने १७ मेपासून सामान्यांना ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
हे कार्ड आता मोफत उपलब्ध होत आहे. पुणे शहरातील नव्याने कार्ड काढणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाईनच अर्थात ई रेशन कार्डच घ्यावे लागत आहे. यासाठी संकेतस्थळावरून किंवा रेशन दुकानांमधून तसेच विभागीय कार्यालयांमध्ये क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर पुढील प्रक्रियेनंतर रेशनकार्डसाठी अर्ज पूर्ण होतो. त्यानंतर हा अर्ज पडताळणीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे येतो. व त्याला मान्यता दिली जाते.
अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच त्यासाठी रेशन अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्वे करावा लागतो. त्यामुळे असे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत आहे. शुभ्र रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वी सात दिवस लागायचे आता देखील याच मुदतीत कार्ड मिळते. रेशन कार्ड मान्य झाल्यानंतर त्याला ते ऑनलाईनच डाउनलोड करता येणार आहे त्यात त्याचे कार्ड कोणत्या दुकानदाराला नेमण्यात आलेला आहे याचा देखील उल्लेख असणार आहे.
राज्य सरकारने ई रेशनकार्डची सुविधा १७ मेपासून उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ११ सप्टेंबरपर्यंत शहरात ७ हजार ५५७ जणांनी ई रेशनकार्ड घेतले आहे. त्यात अंत्योदय योजनेतील ३१ प्राधान्य योजनेतील ५ हजार ६०२ तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील १ हजार ९२४ कार्डधारकांचा समावेश आहे. तर १ ते ११ सप्टेंबर या काळात ७०९ जणांनी ई रेशनकार्ड काढले आहे.
ई रेशनकार्ड काढणे मोफत असूनही काही ठिकाणी एजंट नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी याला बळी पडू नये. ही प्रक्रिया ऑनलाईन व मोफत असल्याने कुणालाही पैसे देऊ नयेत.
- दादासाहेब गिते, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर.