पुण्यातून परदेशात पाेहाेचला साडेसात हजार किलो फराळ, पोस्टाला ५० लाखांचा लाभ
By श्रीकिशन काळे | Published: November 30, 2023 08:38 PM2023-11-30T20:38:20+5:302023-11-30T20:38:46+5:30
शेकडो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असून, त्यातून टपाल विभागाला तब्बल ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे...
पुणे : पुण्यातील नातेवाइकांना परदेशी आप्तेष्टांना दिवाळीच्या फराळाचा आस्वाद देता यावा यासाठी पुणे पोस्ट विभागाने यंदा खास ‘दिवाळी फराळ परदेशात’ ही पार्सल सेवा दिली होती. शेकडो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असून, त्यातून टपाल विभागाला तब्बल ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यात ७ हजार ५०० किलोंचा फराळ परदेशात पाठविण्यात आला.
पाेस्टाने हा उपक्रम २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत राबवला होता. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पुणे शहरातील पोस्ट ऑफिसमधून ८५७ पार्सल गेले. त्यातून जवळजवळ ७ हजार ५०० किलो फराळाचे पार्सल महिनाभरात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा तसेच इतर देशांत पाठवण्यात आले. या उपक्रमात पोस्टमन मार्फत घरून पिकअप तसेच पॅकेजिंगची सुविधा दिली होती.
या कालावधीत उत्तम काम करणाऱ्या पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्याचा गुणगौरव सोहळा पर्वती पोस्ट ऑफिसमध्ये नुकताच पार पडला. या सोहळ्याला पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये, डाक संचालिका सिमरन कौर, गोखले इन्स्टिट्यूटमधील प्रा. आर.पी. गुप्ता, पुणे शहर पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. अभिजित इचके, पुणे शहर पश्चिम विभागाच्या अधीक्षक रिपन दुल्लेत, पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे व पोस्टाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाेस्टाचे उपव्यवस्थापक (व्यवसाय विकास) नागेश डुकरे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक अधीक्षक शरद वांगकर यांनी आभार मानले.
पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा प्रचार-प्रसार अजूनही पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही, तो वाढवण्याची गरज आहे. पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचे दर बाकीच्या कुरिअर सेवेच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यायला हवा. पोस्टमन हा आमचा कणा असून, त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे.
- रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल