खडकवासला धरण प्रकल्पात ७ टीएमसी पाणीसाठा; गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ दिवस अधिकचा साठा
By नितीन चौधरी | Published: May 30, 2023 05:24 PM2023-05-30T17:24:59+5:302023-05-30T17:25:56+5:30
सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा हा शिल्लक असून १९ जूननंतर पिण्याच्या पाण्याबाबत निर्णय घेणार
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासलाधरण प्रकल्पात सध्या ७.०१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ०.७३ टीएमसीने अतिरिक्त असल्याने सुमारे पुणेकरांना आणखी पंधरा दिवसांचा पाणीसाठा सध्या धरणांमध्ये उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाने आवाहन केले आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील साठाही चांगला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिले जाणेर शेतीचे आवर्तन तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध केल्यानंतर आता मेच्या अखेरीस खडकवासला साखळी प्रकल्पामध्ये ७.०१ टीएमसी (२४ टक्के) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणांमध्ये ६.२८ टीएमसी (२१.५६ टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत ३० मे अखेरीस सुमारे ०.७३ टीएमसी एवढा पाणीसाठा अधिक आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा दिवसांचे पाणी अतिरिक्त उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
पुण्याला दरमहा दीड टीएमसी एवढा पाणीसाठा आवश्यक ठरतो. सध्या शेतीला पाचवे आवर्तन सुरू असून ते येत्या १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. शेतीच्या आवर्तनातून दररोज १ हजार ६० क्यूसेक्सने पाणी सोडले जाते. त्यासाठी आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्यात येईल. तसेच पुढील काही दिवस पालखीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरीत चार टीएमसीपैकी कालवानजिक असलेल्या ग्रामीण भागाला पिण्यासाठी पाणी सोडावे लागेल. त्यामुळे सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा हा शिल्लक राहील. त्यानुसार १९ जूननंतर पिण्याच्या पाण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. हा पाणीसाठा हा सुमारे दोन महिने पुरेल एवढा असेल. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
''पुणे शहरासाठी ३१ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जूनमध्ये पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत. त्याबाबत पुणे महापालिकेने पाणीकपात सुरू केली असली तरी पाणी काटकसरीने वापरावे.- हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग''
धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये) टक्के
खडकवासला ०.७७ ३८.७८
पानशेत १.८२ १७.०८
वरसगाव ४.२५ ३३.४४
टेमघर ०.१७ ४.६९
एकूण ७.०१ २४.०४