Vijay Stambh Bhima Koregaon: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाला देशभरातून ७ ते ८ लाख बांधव येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:35 AM2022-12-29T10:35:05+5:302022-12-29T10:35:20+5:30
जिल्हा प्रशासनाने सर्व सुविधा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे
लोणीकंद : यंदा १ जानेवारीला पेरणेफाटा (ता. हवेली) येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाला प्रत्येक जिल्ह्यातून, राज्यातून किंबहुना राज्याबाहेरूनही सुमारे ७ ते ८ लाख बांधव येतील, असा अंदाज करून जिल्हा प्रशासनाने सर्व सुविधा करण्यासाठी जिल्हा परिषदेने जय्यत तयारी केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा किंवा यापूर्वी कधीही झाले अशा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होणार आहे. सक्ती नाही, पण प्रत्येकाने मास्क वापरा, असे आवाहन जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी केले.
पेरणे (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी सर्व विभागांचे नियोजन व तयारी आढावा बैठक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पेरणे येथे विजयस्तंभस्थळी घेण्यात आली. यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे व उपस्थितांनी पाहणी करून विजयस्तंभ स्थळी अभिवादनही केले. यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले, विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व बांधवांसाठी सीसीटीव्ही, सुरक्षित वातावरणासह पार्किंग, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन यासह सर्वतोपरी सेवासुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल. १५०० शौचालय व्यवस्था तयार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी १५० टँकर आरोग्य विभागाचे ५६ डाॅक्टर आणि २४० कर्मचारी तैनात आहेत. तसेच अकरा ठिकाणी आरोग्य तपासणी कक्ष असणार आहे. लहान बाळ आई यांच्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन केले आहे. त्याच्यासाठी आशासेविका व अंगणवाडी ताई मदत करणार आहे.
विविध सुविधांसाठी ग्रामपंचायतीला आवश्यक निधी द्यावा
कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी मराठवाडा विदर्भमधून मोठ्या प्रमाणात बांधव येतात कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सहभागातून विविध सुविधा देण्यात येतात. तरी विविध सुविधांसाठी ग्रामपंचायतीला आवश्यक निधी द्यावा.- संदीप ढेरंगे