विद्यापीठात बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:52 AM2017-12-14T05:52:09+5:302017-12-14T05:52:22+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक सुरक्षारक्षकांनी बुधवारी पकडले. विद्यापीठातीलच एका कर्मचा-याने परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक सुरक्षारक्षकांनी बुधवारी पकडले. विद्यापीठातीलच एका कर्मचाºयाने परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराने विद्यापीठात खळबळ उडाली असून, याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तसेच याची चौकशी करण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दुपारी अचानक राडारोडा भरलेले ७ ट्रक एकापाठोपाठ एक आले. गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्या ट्रकचालकांकडे चौकशी केली असता सेवक वसाहतीमध्ये हा राडारोडा टाकण्यासाठी सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा राडारोडा टाकण्यास कुणी सांगितले आहे, याची विचारणा केली असता त्या ट्रकचालकांना त्याचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे सर्व ७ ट्रकचालकांना अधिक चौकशीसाठी सुरक्षा विभागाच्या मुख्य कार्यालयात घेऊन जाण्यात आले.
सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी स्थावर विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी कोणताही राडारोडा मागविला नसल्याचे तसेच त्या ७ ट्रकशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता विद्यापीठातीलच एका कर्मचाºयाने पैसे घेऊन हा राडारोडा टाकण्यास सांगितल्याची माहिती पुढे आली आहे. सुरक्षा अधिकाºयांकडून त्या दिशेने तपास करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी नुकतेच नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तरीही भरदिवसा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये काही वर्षांपूर्वी एका सुरक्षारक्षकाचा खून झाल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
कर्मचा-यांकडून केले जातेय ब्लॅकमेल
एका कर्मचा-याकडून परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याच्या पार्श्वभूमीवरच विद्यापीठामध्ये काही कर्मचाºयांकडून अधिका-यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या कर्मचाºयांकडून तुमच्याविरुद्ध तक्रार आल्याचे सांगून कधी थेट पैशांची मागणी केली जाते, तर कधी उसने पैसे घेऊन ते परत न देता लुबाडले जात असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठात विविध प्रकारची कामे करणाºया ठेकेदारांना धमकावून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या़ आहेत़
वरिष्ठ अधिका-यांमध्ये दहशत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांना कर्मचाºयांकडून ब्लॅकमेल करून अनेकांना त्रास दिला जात असल्याची सर्व माहिती आहे. मात्र, या कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे धाडस अद्याप विद्यापीठातील एकही अधिकारी करू शकलेला नाही. कामावर न जाता केवळ हजेरी लावणे, पत्नी, मुलगा यांची विद्यापीठात वर्णी लावण्यासाठी दबाव टाकणे असे अनेक गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. मात्र वरिष्ठ अधिकाºयांमध्ये या कर्मचाºयांची दहशत असल्याने गेल्या अनेक वर्षांत त्यांच्याविरुद्ध कुणीही कारवाई करू शकलेले नाही.
चंदनाच्या झाडांची चोरी
विद्यापीठ कॅम्पसमध्ये अनेक चंदनाची झाडे आहेत. या झाडांची रात्रीच्या वेळेस चोरी करण्यात येत असल्याचे प्रकार उजेडात येत आहेत. मात्र, विद्यापीठ कॅम्पसमध्ये नेमकी किती चंदनाची झाडे आहेत याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे अनेक झाडांची चोरी झाली असली तरी त्यांची माहिती सुरक्षा विभागाला होत नसल्याचे दिसून आले आहे.
....त्याचा शोध घेऊ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये टाकण्यात आलेला राडारोडा कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आला याचा शोध घेतला जात आहे. स्थावर विभागाला या राडारोड्याची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे.
- सुरेश भोसले,
संचालक, सुरक्षा विभाग