७ वर्षांच्या मुलीवर सराईताचा चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:01+5:302021-02-10T04:12:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक शौचालयाजवळ पत्ते खेळण्यास विरोध केल्याचा रागातून तिघांनी ७ वर्षांच्या मुलीच्या गालावर चाकूने वार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वजनिक शौचालयाजवळ पत्ते खेळण्यास विरोध केल्याचा रागातून तिघांनी ७ वर्षांच्या मुलीच्या गालावर चाकूने वार करून कुटुंबाला मारहाण केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
करण सुंदरलाल वाल्मीकी (वय २०), पापा वाघेला (वय १९) आणि साहिल ऊर्फ लड्डु वाघेला (वय १९, सर्व रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी बेबी सूरज पाटोळे (वय ४०) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बेबी पाटोळे कुटुंबीयासह रामटेकडी परिसरात राहायला आहे. परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ करण साथीदारांसह पत्ते खेळत होता. त्यामुळे बेबी आणि सूरजने त्याला परिसरात पत्ते न खेळण्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने शिवीगाळ केल्यामुळे बेबी पोलीस चौकीला तक्रार देण्यासाठी गेली होती. त्याचा राग आल्यामुळे करण दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी चारच्या सुमारास बेबी यांच्या घरात गेला. आरोपींनी बेबी यांच्यासह सूरजला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर करणने चाकूने सूरजवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बेबी यांच्या भावाची ७ वर्षीय मुलगी त्याठिकाणी आली. सूरजने वार चुकविल्यानंतर आरोपी करणने केलेल्या चाकू हल्ल्यात ७ वर्षांची मुलगी गंभीररित्या जखमी झाली. पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटवडे तपास करीत आहेत.