निवडणुकीसाठी खर्चमर्यादा ७० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:39 PM2019-04-03T23:39:37+5:302019-04-03T23:40:02+5:30
लोकसभेच्या मावळ मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली आहे.
पिंपरी : लोकसभा निवडणुकीचे अर्ज घेऊन जाण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली असून, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी इच्छुकांनी १४ अर्ज नेले आहेत. निवडणुकीचे प्रत्यक्ष कामकाज मंगळवारपासून सुरू झाले. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा सत्तर लाख असणार आहे.
लोकसभेच्या मावळ मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू झाले आहे. त्यानुसार ९ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारीअर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कविता द्विवेदी काम पाहत आहेत.
नामनिर्देशन पत्र घेऊन जाणे आणि दाखल करण्यासाठीची मुदत सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी १४ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. एकाही व्यक्तीने अर्ज दाखल केलेला नाही. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वळेत अर्ज दाखल करण्याची वेळ असणार आहे. तसेच शनिवार आणि रविवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. मुदतीनंतर दहा एप्रिलला छाननी होणार आहे. तर ११ व १२ ही माघारीची मुदत असणार आहे. त्यानंतर चिन्हवाटप होऊन प्रचार सुरू होणार आहे. १९८ प्रकारची चिन्हे निवडणुकीसाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी गौरी पवार यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ७० लाख असणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासह पाच जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारीअर्ज दाखल करताच एका दिवसातच उमेदवारांना राष्ट्रीयीकृत, तसेच सहकारी बॅँकेत खाते उघडणे बंधनकारक असणार आहे. बँक खात्याविषयी बॅँकांनाही निवडणूक विभागाने सूचना दिल्या आहेत.